सह्याद्री फाउंडेशनतर्फे सावंतवाडीत ‘रानभाज्यांपासून खाद्यपदार्थ ‘ स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सह्याद्री फाऊंडेशनने घेतलेल्या रानभाजी महोत्सवामुळे आजच्या चायनीज खाद्यपदार्थांच्या जमान्यात आपला पारंपारिक नैसर्गिक आहार टिकविण्यासाठी मदत होणार आहे. आपल्या महिला भगिनी आजही रानभाज्यांचा आहारात वापर करतात हे दिसून आलं. सर्वांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीजच कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याचप्रमाणे आयोजकांचे देखील कौतुक आहे कारण अशा स्पर्धांमुळे आपल्या पारंपारिक खाद्य संस्कृतीचे जतन होणार आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार राजन तेली यांनी काढले. सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव २०२३ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘रानभाज्यांपासून पाककला स्पर्धे ‘च्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत ‘कणकीच्या कोंबाचे कटलेट’ या वैशाली मिसाळ यांच्या खाद्य पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला. तर द्वितीय क्रमांक ‘फागल्याचे मोदक ‘ संगीता पाटकर तर ‘फागल्याचा मुठला’ उमा चोडणकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच भावना सबनीस, मधुरा धुरी यांना उत्तेजनार्थ व अनमोल गावडे यांना उत्कृष्ट रेसिपी पारितोषिकाने गौरविण्यात आले. स्पर्धेत एकूण ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.सावंतवाडी शहरातील हॉटेल पलॅ येथे क्रांती दिनानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या रेखा कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षिस वितरण माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी रेखा कुमठेकर, आहार तज्ञ श्रीमती विनया बाड, माजी नगराध्यक्ष संजू परब, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, कार्यवाह ॲड. संतोष सावंत, सचिव प्रताप परब, उपाध्यक्ष विभावरी सुकी, मोहिनी मडगावकर, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, व्यवस्थापक प्रल्हाद तावडे, सुहास सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी आहार तज्ञ श्रीमती विनया बाड तसेच प्रथमेश मडगावकर हा पायलट झाल्याबद्दल त्याच्या आईचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परीक्षक प्रसन्न कोदे म्हणाले, सह्याद्री फाउंडेशनने रानभाज्या स्पर्धा व प्रदर्शन ठेवून आजच्या काळात लोक पावत चाललेल्या रानभाज्यांना एक वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. या रानभाज्या कशा बनवायच्या त्याची कार्यशाळा व्हायला हवी. या स्पर्धेमध्ये विविध आगळ्यावेगळ्या रानभाज्या डिश पाहायला मिळाले असे सांगितले. तर अशा रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या महिलांचे दिल्ली दरबारी कसे भरवता येईल या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करावेत तरच आपल्या रानभाज्यांना एक वेगळे मार्केट निर्माण होईल, अशी मागणी कार्यवाह ॲड. संतोष सावंत यांनी केली. सौ. विभावरी सुकी व मोहिनी मडगावकर यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ॲड. संतोष सावंत तर आभार सचिव प्रताप परब यांनी मानले.
यावेळी गजानन बांदेकर, प्रमोद सावंत, विजय चव्हाण, शशिकांत मोरजकर, संदीप सुकी,नाना बिडये, दीपक राऊळ, सुरेश सांगेलकर, वैदेही गावडे, संगीता सावंत, वंदना राऊळ, मंगल देसाई, मोरजकर, राऊळ, सरमळकर, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, विजय देसाई, अनंत जाधव, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, सांगेलकर, अभिषेक राऊळ, दिव्यांनी कुमठेकर आदी उपस्थित होते.











