मालवण | प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पुर्ण करण्यात यावे या मागणीचे निवेदन मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने शासन प्रतिनिधी म्ह्णून तहसीलदार वर्षा झालटे यांना सादर करण्यात आले.
मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि तब्बल १२ वर्षे रखडलेले महामार्गाचे काम बाबत रायगडमधील पत्रकार बोबाबोंब आंदोलन करत आहेत. या आंदोलनास महाराष्ट्र पत्रकार परिषदेचा पूर्ण पाठिंबा असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांनीही पाठिंबा दर्शविला आहे. कोकणच्या सर्वागीण विकासासाठी रखडलेल्या या मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने कोकणवासीयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नी प्राधान्याने लक्ष देऊन एक तप रखडलेल्या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी तालुका पत्रकार समिती हे निवेदन देऊन रायगडमधील पत्रकारांच्या आंदोलनास सुद्धा जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत. तरी आमच्या रखडलेल्या रस्ता कामांबाबत असलेल्या तीव्र भावना राज्यसरकारकडे पोहोचवून मुंबई – गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पुर्ण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.
यावेळी समिती अध्यक्ष संतोष गावडे, विद्याधर केनवडेकर, नंदकिशोर महाजन, कुणाल मांजरेकर, प्रशांत हिंदळेकर, अमित खोत, मनोज चव्हाण, संदीप बोडवे, गणेश गावकर आदी उपस्थित होते












