​सावंतवाडीतील बंद पर्यटन सुविधा केंद्रावर चोरांचा डल्ला

पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघे रंगेहात ताब्यात

​सावंतवाडी :
गेल्या दीड वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या सावंतवाडी येथील पर्यटन सुविधा केंद्रावर आता चोरांचा डोळा पडला आहे. येथील महागड्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, सावंतवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन अट्टल चोरांना आज पहाटे रंगेहात पकडण्यात आले. संशयास्पदरीत्या ‘एसी कॉम्प्रेसर’ घेऊन जाणाऱ्या या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे केंद्र सध्या मोकाट गुरांचा अड्डा बनले असल्याने सावंतवाडी नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​ ​मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीतील ‘तीन मूशी’ परिसरात पोलीस हवालदार कोरगावकर आणि पोलीस कर्मचारी सुरेश पाटील हे नेहमीप्रमाणे रात्रकालीन गस्तीवर होते. यादरम्यान त्यांना एका वाहनाची हालचाल संशयास्पद वाटली. पहाटेच्या शांततेत गाडी घाईघाईने जात असल्याने पोलिसांनी तात्काळ तत्परता दाखवत सदर वाहन थांबवले.

​पोलिसांनी वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यामध्ये एक महागडा ‘एसी कॉम्प्रेसर’ आढळून आला. गस्तीवरील पोलिसांनी वाहनातील तरुणांकडे या मालाबाबत आणि तो कुठे घेऊन चालले आहेत, याविषयी चौकशी केली. मात्र, या दोन्ही तरुणांना आपल्या ताब्यातील या महागड्या मालाबाबत कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण किंवा वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत.

​दोघांवर गुन्हा दाखल; पोलीस हवालदारांचे कौतुक
​हा माल पर्यटन सुविधा केंद्रातून चोरलेला असल्याचा दाट संशय आल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही मुद्देमालासह ताब्यात घेतले. याप्रकरणी उमेश नाईक (वय ३१, रा. माणगाव कालेली) आणि सोहम पिळणकर (वय १९, रा. सालईवाडा, सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश पाटील हे करत असून, हा माल त्यांनी नक्की कुठून चोरला, यात आणखी कोणाचा हात आहे का आणि ते तो कुठे विकायला घेऊन चालले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. पहाटेच्या वेळी अत्यंत सतर्कता दाखवून ही मोठी चोरी उघडकीस आणणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सावंतवाडी परिसरात कौतुक होत आहे.

​पर्यटन सुविधा केंद्र बनले मोकाट गुरांचा अड्डा!
​गेल्या दीड वर्षांपासून हे पर्यटन सुविधा केंद्र पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. याठिकाणी काही वर्षांपूर्वी खासगी तत्त्वावर हॉटेल व्यवसाय सुरू होता. मात्र, कराराची मुदत संपल्यानंतर हे केंद्र प्रशासनाने ताब्यात घेतले, पण त्यानंतर ते बंदच राहिले. देखभालीअभावी या शासकीय मालमत्तेची मोठी दुरवस्था झाली असून, आता हा परिसर मोकाट गुरांचा अड्डा बनत चालला आहे.

​ कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ही वास्तू चोरांचे आणि गुरांचे माहेरघर बनत चालल्याने सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.