कुरंगी आदिवासीवाडीत रहस्यमय प्रकार; पोलिसांकडून तपास सुरू
मुलावर रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुरंगी आदिवासीवाडीत एक अत्यंत धक्कादायक आणि रहस्यमय घटना घडली आहे. घराच्या परिसरात खेळत असलेल्या 10 वर्षीय मुलाच्या शरीरात अचानक छर्रे घुसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमागे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.
कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुरंगी आदिवासीवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या मागील बाजूस खेळत असताना हेमंत रामदास सराई (वय 10) या मुलाच्या शरीरात अचानक छर्रे घुसल्याने तो जमिनीवर कोसळला.
घटनेनंतर मुलाने आरडाओरड करत आईला हाक मारली. आवाज ऐकून कुटुंबीय धावत बाहेर आले असता मुलगा गंभीर अवस्थेत विव्हळताना दिसला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले.
कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या मदतीने मुलाला पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत मुलाच्या शरीरात नेमके छर्रे कसे घुसले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार जवळच्या जंगल परिसरात शिकारीदरम्यान बंदुकीतून सुटलेले छर्रे लागले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, ही केवळ शक्यता असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून परिसरातील नागरिकांकडूनही माहिती घेतली जात आहे.
या घटनेमुळे आदिवासीवाडी परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलावर झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून छर्रे नेमके कुठून आले याचा शोध घेण्यात येत आहे. अधिकृत निष्कर्ष तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.











