विरोधी INDIA आघाडीची दिल्लीत मोठी बैठक

 

2024 निवडणुकीनंतर पहिली मोठी विरोधकांची एकत्र बैठक
23 पक्षांचे नेते सहभागी; काही पक्षांची अनुपस्थिती चर्चेत

नवी दिल्ली येथे विरोधी INDIA आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. 2024 लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिली औपचारिक मोठी बैठक मानली जात आहे. या बैठकीत काँग्रेससह 23 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले. मात्र DMK आणि AAP या पक्षांनी या बैठकीला गैरहजेरी लावली. या बैठकीत अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि विरोधकांची एकजूट पुन्हा चर्चेत आली.


नवी दिल्ली : विरोधी INDIA आघाडीची सोमवारी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. 2024 लोकसभा निवडणुकीनंतर झालेली ही पहिली मोठी राजकीय बैठक असून यात 23 पक्षांचे एकूण 27 नेते सहभागी झाले. काँग्रेसच्या वतीने सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल उपस्थित होते. तसेच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनीही बैठकीत सहभाग घेतला.

या बैठकीत राजदचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, तसेच सीपीएम, सीपीआय, शिवसेना (UBT) यांसह अनेक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्युअली सहभाग नोंदवला. राज्यसभा सदस्य आणि माजी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचीही उपस्थिती विशेष चर्चेत राहिली.

दरम्यान, DMK आणि आम आदमी पार्टी (AAP) या पक्षांनी या बैठकीपासून दूर राहणे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. विरोधी आघाडीतील एकजूट आणि आगामी राजकीय रणनीती यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या बैठकीमुळे विरोधकांची आगामी निवडणुकांसाठीची तयारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.