विद्यार्थ्यांना वाकी शाळेत न पाठविण्याचा इशारा
गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या नादुरुस्त वर्गखोल्यांचा प्रश्न गंभीर बनला असून पालक व ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शाळेतील उर्वरित दोन वर्गखोल्यांच्या छप्पर दुरुस्तीचे काम तातडीने हाती न घेतल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.
वाकी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरविले जातात. शाळेतील एकूण चार वर्गखोल्यांपैकी सर्वच वर्गखोल्यांची छपरे मोडकळीस आली होती. याबाबत ग्रामस्थ व पालकांनी मागील वर्षी संबंधित खात्याकडे मागणी केली होती. मात्र शासन, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गाव विकास कमिटीच्या पुढाकारातून ग्रामस्थांनी श्रमदान करून दोन वर्गखोल्यांच्या छप्परांची तात्पुरती दुरुस्ती केली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली. तथापि, उर्वरित दोन वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम अद्यापही प्रलंबित आहे. चालू शैक्षणिक वर्षातही सात वर्गांचे अध्यापन केवळ दोन वर्गखोल्यांमध्ये करण्याची वेळ येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळणे आवश्यक असताना या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गाव विकास कमिटीने पंचायत समितीच्या सभापतींकडे निवेदन सादर करून उर्वरित वर्गखोल्यांच्या छप्पर दुरुस्तीच्या कामास तातडीने मंजुरी देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचे संभाव्य शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित हस्तक्षेप करून शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.













