दापोली(प्रतिनिधी):
दापोली तालुक्यात बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळकी ते आगरवायंगणी गावाच्या सीमेवर असलेल्या बांधाच्या आडोशाला विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश बाबु दवंडे (वय ४०, रा. कळकी शिगवणवाडी, ता. दापोली) असे या प्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार अजित गोपाळ गुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० जून रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपी दिनेश दवंडे हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगून असताना पोलिसांना आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी ६२० रुपये किमतीची एकूण ६ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












