खेड (प्रतिनिधी) : ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र, खेड यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी (दि. ११ जून) सकाळी महाड नाका येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आपल्या शाळा अथवा महाविद्यालयात प्रथम तीन क्रमांकांत स्थान मिळविणारे तसेच ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाड नाका परिसराचे नगरसेवक व बांधकाम सभापती सुनील दरेकर, कुंभोज सेवा केंद्रावरून आलेल्या प्रमुख मार्गदर्शक शिल्पा बेहन, संजय वाजे गुरुजी, तसेच पालक प्रतिनिधी म्हणून आसमा पारकर व मरियम पारकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात परमेश्वराच्या मधुर स्मृतीने करण्यात आली. सूत्रसंचालन शितल चिखले यांनी केले. ब्रह्माकुमारी स्वरूपा, सुप्रभा आणि चिन्मयी यांनी पाहुण्यांचे तिलक, रोप आणि ओम शांतीचे अंगवस्त्र देऊन स्वागत केले. विद्यार्थिनी काव्या धुमाळ हिने सादर केलेल्या स्वागत नृत्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.
राजयोगिनी गीता बेहन यांनी स्वागतपर मनोगतातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाच्या मुख्य सत्रास प्रारंभ झाला.
मार्गदर्शन करताना शिल्पा बेहन यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील खऱ्या परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. शैक्षणिक परीक्षांप्रमाणे जीवनातील आव्हाने पूर्वसूचना देऊन येत नसतात. अशा प्रसंगी यशस्वी होण्यासाठी सद्गुण, श्रेष्ठ विचार, चांगले संस्कार, आत्मिक शक्ती आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यांची शिदोरी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विविध उपक्रम आणि संवादात्मक पद्धतीतून त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचे महत्त्व आणि जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या.
सुनील दरेकर यांनी मनोगत व्यक्त करताना ब्रह्माकुमारी संस्थेशी आपला दीर्घकाळापासून जवळचा संबंध असल्याचे सांगितले. या केंद्रात आल्यानंतर नेहमीच शांतीची अनुभूती मिळते, असे सांगत त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत त्यांनी यशाचा हा प्रवास सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. पालक प्रतिनिधी आसमा पारकर आणि मरियम पारकर यांनीही कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा विशेष उपक्रमही राबविण्यात आला. उपस्थितांना वृक्षारोपणासाठी रोपे देण्यात आली. या रोपांप्रती प्रेम, जिव्हाळा आणि संवेदनशीलता कशी जोपासावी याबाबत गीता बेहन आणि शिल्पा बेहन यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, ईश्वरीय भेटवस्तू आणि प्रसाद देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी आपल्या यशामध्ये पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात झालेला हा सन्मान आपल्या आयुष्यातील अभिमानास्पद क्षण असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.













