आजगावसह दशक्रोशीतील खनिज ड्रोन सर्वेक्षणाविरोधात मंगळवारी भव्य रॅली

देवभूमी टिकवण्यासाठी कोकणी बाणा दाखवणार : संजू परब

सावंतवाडी । प्रतिनिधी :

आजगावसह दशक्रोशीतील १८ गावांमध्ये होणाऱ्या खनिज ड्रोन सर्वेक्षणाविरोधात ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. या सर्वेक्षणाचा निषेध करण्यासाठी आजगाव येथील श्री वेतोबा मंदिरात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत येत्या मंगळवारी आजगाव वेतोबा मंदिर ते आरवली वेतोबा मंदिरापर्यंत एक भव्य निषेध रॅली काढण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. देवभूमी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी या रॅलीत सर्वपक्षीयांसह निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे.

बैठकीत बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, श्री वेतोबाच्या आशीर्वादाखाली आपण सर्वजण आपले राजकीय विचार बाजूला ठेवून निसर्गाच्या रक्षणासाठी एकत्र आलो आहोत. या लढ्यात सर्वांनी संघटित राहणे गरजेचे आहे.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांना या रॅलीत सहभागी करून घेण्यासाठी आपले विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, मनसेच्या माध्यमातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही संपर्क साधला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. जरी प्रत्यक्ष सर्वेक्षण १० ते १८ गावांत असले, तरी या आंदोलनात संपूर्ण जिल्ह्यातून लोक सहभागी होतील. आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने विरोध करत आहोत, परंतु जर हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, तर वेळप्रसंगी आम्ही आमचा ‘कोकणी बाणा’ दाखवून देऊ, असा इशाराही परब यांनी दिला. पुढील चार दिवसांत हा संदेश घराघरांत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी निसर्गाचे ओरबाडणे रोखण्यासाठी मनसे पूर्ण ताकदीने ग्रामस्थांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या या रॅलीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संबोधित करावे, या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

या प्रसंगी बोलताना ॲड. स्वप्नील प्रभूआजगावकर यांनी, हा लढा केवळ कोणा एकाचा नसून प्रत्येक गावाचा आहे असे समजून सर्वांनी यात सामील व्हावे, असे आवाहन केले. आजगावच्या सरपंच यशश्री सौदागर यांनी गावाच्या भौगोलिक आणि आर्थिक महत्त्वावर प्रकाश टाकला. “आमचे गाव निसर्गसंपन्न असून येथे आंबा, काजूच्या मोठ्या फळबागा आहेत. जर येथे खनिज उत्खनन किंवा सर्वेक्षणामुळे विध्वंस झाला, तर इथले जलस्रोत पूर्णपणे खराब होतील. त्यामुळे आम्हाला येथे कोणताही खाण प्रकल्प नको आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष अजित नातू, ॲड. स्वप्नील प्रभूआजगावकर, आजगावच्या सरपंच यशश्री सौदागर, रुपेश धर्णे, सचिन प्रभू, अमित प्रभू, सागर नाणोसकर, सिद्धेश परब, सुरज परब, देव्या सुर्याजी, मिलिंद सावंत, जितेंद्र मोरजकर, आबा चिपकर, नील प्रभू झांटये, रामचंद्र ऊर्फ अण्णा झाटये, श्रीनाथ केदार, रवींद्र धर्णे, सतीश आकेरकर, राजेश आजगावकर, सौरभ वराडकर, शुभम जोशी, जय केदार, हरेश वरडाकर, गोविंद वैज, संदेश वैज, सावळाराम केदार, आबा केदार आणि अभी केदार यांच्यासह दशक्रोशीतील ग्रामस्थ व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.