रत्नागिरी जिल्ह्यात आगामी दिवसांत मध्यम पावसाची शक्यता; कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना विशेष सल्ला

रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी आगामी ५ दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार, जिल्ह्यात २० जून रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून २१ व २२ जून रोजी काही ठिकाणी अत्यंत हलका पाऊस पडू शकतो. मात्र, २३ जून रोजी बहुतांश ठिकाणी हलका, तर २४ जून रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअम दरम्यान राहील. विशेषतः २२ आणि २३ जून रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि ताशी ३० ते ५० किमी वेगाचा सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हवामानाची अचूक माहिती मिळवण्यासाठी ‘मेघदूत’ आणि ‘दामिनी’ मोबाईल ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामानाचा हा अंदाज लक्षात घेऊन कृषी तज्ज्ञांनी खरीप भात, नागली आणि वरी उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सध्या रोपवाटिका वाढीच्या अवस्थेत असून, कमी पाऊस किंवा पावसाचा खंड पडल्यास जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन नदी, नाले, विहीर किंवा शेततळ्यांच्या माध्यमातून पिकांना संरक्षक सिंचन द्यावे. सिंचन देण्यापूर्वी रोपवाटिकेतील तणांचे योग्य वेळी नियंत्रण करणे गरजेचे आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे नव्याने लागवड केलेल्या आंबा व काजू कलमांचे, तसेच सुपारी व नारळाच्या रोपांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठ्यांचा भक्कम आधार द्यावा. फळबागांच्या नवीन लागवडीसाठी जून महिना हा योग्य काळ असून, आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या नवीन लागवडीसाठी शिफारसीत आकाराचे खड्डे खोदून त्यात सुपीक माती, शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवी नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस पावडरचे मिश्रण भरून पूर्वतयारी पूर्ण करावी. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी सुपारीची लागवड ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान करावी.

भाजीपाला उत्पादकांनी जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध झाल्यानंतरच काकडी, पडवळ, कारले, दुधी भोपळा, डांगर व घोसाळे यांसारख्या वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड सुरू करावी. बियाणे पेरताना प्रत्येक आळ्यात २ किलो शेणखत व ५० ते ६० ग्रॅम सुफला मिश्रखत द्यावे, तसेच रोपावस्थेतील मर किंवा खोडकुज या रोगाच्या नियंत्रणासाठी ‘ट्रायकोडर्मा’ हे जैविक बुरशीनाशक शेणखतात मिसळून वापरावे. दुसरीकडे, वाढत्या तापमानामुळे पशुधन आणि कुक्कुटपालनाची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. जनावरांना आणि पक्ष्यांना दिवसभर स्वच्छ, ताजे व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. जनावरांचा उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी १% गूळ व ०.५% मीठ यांचे द्रावण चाऱ्यावर शिंपडावे, तर कोंबड्यांना उष्णतेचा ताण बसू नये म्हणून खाद्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता असल्याने जनावरांना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली बांधू नये, त्यांना सुरक्षित गोठ्यात ठेवावे आणि पोल्ट्री शेडच्या खिडक्या व्यवस्थित बंद ठेवून पक्ष्यांचे वाऱ्या-पावसापासून संरक्षण करावे, असा सल्ला दापोली कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने दिला आहे.