विकासदृष्टी, कार्यकर्त्यांवरील प्रेम आणि जनतेशी असलेली नाळ जपणारे नेतृत्व : नामदार नितेश राणे

हेमंत कुळकर्णी

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाभिमुख कार्याचा आढावा घेताना अभिमानाची भावना निर्माण होते. तडफदार नेतृत्व, निर्णयक्षम कार्यशैली आणि जनतेसाठी सातत्याने झटण्याची वृत्ती यामुळे नितेश राणे यांनी अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

 

“राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून विकासासाठी असावे आणि प्रत्येक दिवस हा जनतेच्या कामासाठी असावा,” या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघाचे गेली बारा वर्षे ते प्रभावीपणे प्रतिनिधित्व करत आहेत. जनतेच्या विश्वासाला न्याय देत त्यांनी विकासकामांचा धडाका कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा संपूर्ण राज्यावर उमटवला.

 

संघर्ष, मेहनत आणि जिद्द यांच्याच बळावर उभा राहिलेला हा नेता आज हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. कोणतीही पार्श्वभूमी गृहीत न धरता स्वतःच्या कर्तृत्वाने आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कातून त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. नियोजनबद्ध पक्षबांधणी, कार्यकर्त्यांशी असलेले घट्ट नाते आणि संघटनशक्तीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला क्रमांक एकचा पक्ष बनविण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे.

 

स्वतःचा कार्यकर्ता घडवणे आणि त्याला जपणे ही कला प्रत्येक राजकारण्याला जमत नाही. मात्र नितेश राणे यांच्याकडे ही विलक्षण क्षमता आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे ते धाकटे पुत्र. कार्यकर्त्यांशी असलेले नाते, त्यांच्यावरील विश्वास आणि संकटसमयी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वृत्ती हा वारसा त्यांनी आपल्या वडिलांकडूनच घेतला आहे. त्यामुळेच आज जिल्हाभरात त्यांच्याबद्दल असलेला आत्मीयतेचा भाव अधिक दृढ झाला आहे.

 

मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी या खात्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा त्यापैकी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या निर्णयामुळे राज्यातील लाखो मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे विविध शासकीय सुविधा आणि सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला. मच्छीमार समाजाच्या दृष्टीने हा एक मैलाचा दगड ठरला आहे.

 

मच्छीमारीचे आधुनिकीकरण, बंदरांचा विकास, जलमार्गांचे नूतनीकरण आणि मच्छीमारांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या मंत्रालयाच्या कार्यक्षमतेची दखल राज्य शासनानेही घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मंत्रालयीन कार्यक्षमता मूल्यांकनात त्यांच्या खात्याने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली झेप विशेष उल्लेखनीय आहे. पर्यटन क्षेत्राचा विस्तार, विमानसेवेचा विकास, जलमार्ग प्रकल्प, आधुनिक पायाभूत सुविधा आणि देशातील पहिला एआय जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे सिंधुदुर्ग जिल्हा राज्याच्या विकासनकाशावर अधिक ठळकपणे झळकू लागला आहे.

 

चिपी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याशिवाय सिंधुदुर्गातील विविध तीर्थक्षेत्रांना सागरी मार्गाने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्पही त्यांनी मांडला आहे. या उपक्रमामुळे पर्यटन, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

 

दूरदृष्टी, धडाडी, कार्यक्षम नेतृत्व आणि जनतेशी असलेली घट्ट नाळ या गुणांच्या बळावर नामदार नितेश राणे यांचे नेतृत्व दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर झेपावेल, असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात आहे.

 

या वाढदिवसानिमित्त या कर्तृत्ववान, जिद्दी, विकासाभिमुख आणि सिंधुदुर्गच्या भूमीचा अभिमान असलेल्या लोकनेत्याला प्रहार डिजिटलचा मानाचा मुजरा!

 

नामदार नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच सदिच्छा.