रत्नागिरी: १६ जून ते ३१ जुलै दरम्यान ‘अतिसार थांबवा’ अभियान

रत्नागिरी :

जिल्ह्यामध्ये अतिसार (डायरिया) या आजाराचे प्रमाण वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी दि.16 जून 2026 ते दि.31 जुलै 2026 या कालावधीत अतिसार थांबवा (Stop Diarrhoea) हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पाणी व स्वच्छता क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत तालुका व ग्रामस्तरावर बैठका घेऊन ग्रामपंचायती, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

गावनिहाय पाणी गुणवत्तेची तपासणी केली जाणार असून विद्यार्थ्यांना व स्वयंसेवकांना फिल्ड टेस्ट किटद्वारे पाणी परीक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेऊन गळती असलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण तसेच नियमित क्लोरिनीकरणावर विशेष भर दिला जाणार आहे. नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्यात किमान 0.2 पीपीएम मुक्त अवशिष्ट क्लोरीन राखले जात असल्याची खात्री करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. साबणाने हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर, अन्न हाताळताना घ्यावयाची काळजी आणि अतिसार प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

गावस्तरावर स्वच्छता मोहिमा राबवून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि सुरक्षित कचरा हाताळणीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यातयेणार आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारीमुक्त स्थिती कायम राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक सागर पाटील यांनी दिली.