जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांचा पुढाकार
सावंतवाडी । प्रतिनिधी : ग्रामपंचायतींचा कारभार चोख व पारदर्शक व्हावा यासाठी आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने पुढाकार घेतला असून जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘क्यू आर कोड ‘ चे वितरण केले जात आहेत. यामुळे ग्रामस्थांना नळपाणी तसेच ग्रामनीधी खात्यांमध्ये भरणा करावयाच्या रक्कम आता थेट ‘क्यु आर कोड ‘ मार्फत ग्रा.प.खात्यामध्ये वर्ग करता येणार आहेत. जिल्हा बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्राहकांकडून कौतुक होत आहे. सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असतानाच ग्राहकांच्या हिताचे अनेक स्तुत्य उपक्रम बँकेकडून राबविले जात आहेत. सावंतवाडी तालुक्यात एकुण ६३ ग्रामपंचायती असून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ‘ क्यु आर कोड ‘ उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यासाठी आवश्यक कागद पत्रांचा नमुना संच ग्रामपंचायतमध्ये पोहोच करण्यात आलेला आहे. यामुळे ग्रामस्थांना नळपाणी,तसेच ग्रामनीधी खात्यांमध्ये भरणा करावयाच्या रक्कम आता थेट ‘क्यु आर कोड ‘ मार्फत ग्रा.प.खात्यामध्ये वर्ग करता येईल. यामुळे वेळ तर वाचणार आहेच परंतु व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येउन सर्वांसाठी व्यवहार सोयीचे होतील.
सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव, कोलगाव, माडखोल,सरमळे,ओटवणे,सोनुर्ली,मळेवाड कोंडुरे,कारिवडे इ.ग्रामपंचायतींना ‘क्यु आर कोड ‘ बँकेने उपलब्ध करुन दिलेले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रासह नजिकच्या सिंधुदूर्ग बँकेच्या शाखेत संपर्क साधुन ‘ क्यु आर कोड ‘ मागणी करण्याचे आवाहन सिंधुदूर्ग जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी केले आहे.












