महिलांनो, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाकडे पाऊल टाका-सभापती शर्वरी वेल्ये

कसबा ग्रामपंचायतीत ‘एकल महिला दिन’ उत्साहात; बचत गट, गृहउद्योग आणि शासकीय योजनांचे मोलाचे मार्गदर्शन

देवरूख (प्रतिनिधी):

बचत गटांमध्ये सहभागी होणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. बचत गट हे केवळ पैसे साठवण्याचे साधन नसून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबनाकडे नेणारे एक प्रभावी माध्यम आहे. बचतीची सवय, सुलभ कर्जाची सुविधा आणि गृहउद्योगासाठी मिळणारे भांडवल या सर्व गोष्टींचा योग्य वापर करून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी केले. ​कसबा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एकल महिला दिन’ कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी कसबा ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा लाणे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
​
​आपल्या सविस्तर मार्गदर्शनात सभापती शर्वरी वेल्ये यांनी महिलांना आर्थिक शिस्त अंगीकारण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या कि, ​महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन लघु व गृहउद्योग सुरू करावेत. यासाठी आवश्यक असणारे भांडवल कशा प्रकारे उपलब्ध होते, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. शासनाच्या विविध महिला कल्याण, स्वयंरोजगार आणि उद्योजकता योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. विशेषतः एकल महिलांनी कोणत्याही परिस्थितीला न घाबरता, आत्मविश्वासाने पुढे येत स्वतःचा व्यवसाय उभारावा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवावे, यावर त्यांनी भर दिला. या कार्यक्रमात ‘यशदा’च्या मास्टर ट्रेनर श्रीमती शेलार तसेच कसबा प्रभाग समन्वयक श्रीमती नाझरे यांनी उपस्थित महिलांना ‘उमेद’ (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) अंतर्गत बचत गटांचे महत्त्व समजावून सांगितले.

बचत गटांमुळे महिलांना मिळणारे आर्थिक व सामाजिक लाभ आणि महिला सक्षमीकरण याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ कसा मिळवून घेता येईल, याची सविस्तर प्रक्रिया त्यांनी मांडली. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुन्या रूढी-परंपरांना छेद देत, उपस्थित विधवा महिलांचा हळदी-कुंकू समारंभ करण्यात आला. त्यांना आदराचे स्थान देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या कौतुकास्पद आणि प्रेरणादायी कार्यक्रमाला कसबा परिसरातील एकल महिला अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण करून या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.