बांदा (प्रतिनिधी) : मडुरा रेल्वे स्थानकावर कोकणकन्या, तुतारी तसेच गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्याबाबत सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. तहसीलदार श्रीधर पाटील, कोकण रेल्वे अधिकारी व रेल्वे संघर्ष समिती शिष्टमंडळ यांच्यात तडजोड न झाल्याने मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थ स्वातंत्र्यदिनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याची माहिती माजी सरपंच सुरेश गावडे यांनी दिली.
कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा रेल्वे स्थानक केवळ क्रॉसिंग स्टेशन बनले आहे. कोरे सह स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिकांना कोकण रेल्वेचा काहीही फायदा राहिलेला नाही. स्थानकावर केवळ दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला थांबा आहे. या स्थानकावर कोकणकन्या रेल्वेला थांबा मिळावा. तसेच तुतारी एक्सप्रेस मडुरा स्थानकातून सोडण्यात यावी अशी स्थानिकांची अनेक वर्षांची मागणी आहे.
या मागण्यांसाठी आठ दिवसांपूर्वी सावंतवाडी तहसीलदारांचे लक्ष वेधण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार, कोकण रेल्वे अधिकारी व मडुरा रेल्वे संघर्ष समितीची संयुक्त बैठक झाली. कोरे प्रशासनाने नेहमीप्रमाणे दिशाभूल करणारी माहिती दिली. मात्र, संघर्ष समिती आपल्या मागण्यावर ठाम राहिली. अखेर कोणताही निर्णय न झाल्याने मंगळवार १५ ऑगष्ट रोजी सकाळी १० वाजता कोरे प्रशासना विरोधात सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडणार आहेत.
यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, सातोसे माजी सरपंच बबन सातोसकर, देवस्थान समिती अध्यक्ष वसंत धुरी, सुजीत देसाई, मडुरा माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर उपस्थित होते.











