आचरा ते देवबाग आयोजन ; स्थानिक मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांचे प्रश्न जाणून घेणार ; देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक यांच्या समस्या जाणून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाला एक परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या उद्देशाने माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्या नेतृत्वाखाली आचरा संगम ते देवबाग संगम या मालवण किनारपट्टी मार्गावर सागरी परिक्रमा यात्रा २५ ते २७ ऑगस्ट या कालावधित काढण्यात येणार आहे.
कोणत्याही पक्षाच्या बॅनर खाली एकत्र न येता सर्वपक्षीय व स्थनिक स्वरूपात ही परिक्रमा करण्यात येणार आहे. अशी माहिती देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी दिली.
सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत उल्हास तांडेल बोलत होते. यावेळी शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, जिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, शहरप्रमुख बाळू नाटेकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, महिला उपतालुकाप्रमुख भारती घारकर, विभाग प्रमुख मयुरी घाडीगावकर, उद्योजक मनोज खोबरेकर, मारूती सुर्यवंशी, मच्छीमार नेते दिलीप घारे, कांचन खराडे, अभिषेक कांदळगावकर आदी उपस्थित होते.
आचरा संगम याठिकाणी मच्छीमारांची सभा आयोजित करून या यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सर्व पक्षीयांना यामध्ये समाविष्ठ करण्यात येणार आहे. मच्छीमार तसेच पर्यटन व्यवसायिक यांच्या समस्या आणि त्यावर तोडगा यासाठीच या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. २५ रोजी प्रारंभ झाल्यानंतर हिर्लेवाडी, तोंडवळी, तळाशिल याठिकाणी भेटी देण्यात येणार आहेत. २६ रोजी सर्जेकोट, कोळंब, मालवण धुरीवाडा याठिकाणी सभा होणार आहेत. २७ रोजी वायरी, तारकर्ली आणि देवबाग याठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. देवबाग येथे जाहीर सभा होवून यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेत किनारपट्टीवरील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व पदाधिकारी यांना निमंत्रीत करण्यात येणार आहेत, असेही तांडेल यांनी सांगितले.
मच्छीमार गावे वाचविण्यासाठी आता पुढे येण्याची वेळ आलेली आहे. शासनाकडून एक पाऊल पुढे टाकले जात असल्याने आता मच्छीमार बांधवांनीही आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडून त्या सोडवून घेण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. देवबाग आणि तळाशिल गावे पूर्णपणे वाचविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विशिष्ठ बंधाऱ्यांच्या कामांना चालना मिळण्याचा यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. या बंधारा माध्यमातून किनाऱ्यावर माती वाढून किनारपट्टीवरील गावांचे संवर्धन, कांदळवनाचे रक्षण आणि सीआरझेडच्या जाचक अटींतून सुटका करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहणार आहोत, असेही श्री. तांडेल यांनी स्पष्ट केले.
देवबाग बंधाऱ्यासाठी आवश्यक असणारे सुमारे २०० कोटी रूपयांचा निधी केंद्राच्या सागरमाला योजनेतून उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून महत्वपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. यासाठी शासन स्तरावरून सर्व आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेणे काम सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटन वाढीसाठी स्थानिक भुमीपुत्रांना मदत उपलब्ध करून देण्यासाठीही शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मच्छीमारांना न्याय मिळण्यासाठी गावठाण जमिनीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक कमिती गठीत केलेली आहे. या कमिटीमार्फत लवकरच मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. या समितीवर सिंधुदुर्गातील एका मच्छीमार प्रतिनिधीला स्थान मिळणार आहे. शिवसेना ही मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी सतत प्रयत्नशिल असून सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हेही दक्षतेने कार्यरत आहेत. कमिटी गठीत केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे आम्ही आभार मानतो, असे विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी यावेळी सांगितले.












