कणकवली : बेदरकार व निष्काळजीपणे मोटारसायकल चालवून अपघात घडवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखालील आशिये येथील साहिल संदेश ठाकूर याची कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. उमेश सावंत यांनी बाजू मांडली.
या प्रकरणानुसार, २२ फेब्रुवारी २०२१ रोजी अनंत नाटळकर हे मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथील साफल्य स्वीट्स दुकानात खाजा खरेदीसाठी गेले होते. दुकानासमोर त्यांनी मोटारसायकल थांबविली असता समोरून आलेल्या मोटारसायकलने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर गोव्यात उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी साहिल ठाकूर याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४-अ, २७९, ३३७, ३३८ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, ३(१), १८१ आणि १४६/१९६ अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, अपघाताचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसणे, आरोपीने बेदरकार अथवा निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठोस पुरावा सादर न होणे, तसेच मृत्यू हा आरोपीच्या निष्काळजी वाहनचालनामुळेच झाला हे शंकातीतपणे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे न्यायालयाने नमूद केले.
तसेच तपासातील त्रुटी, पुराव्यातील विसंगती आणि प्रत्यक्षदर्शी पुराव्याचा अभाव यांचा विचार करून न्यायालयाने आरोपी साहिल संदेश ठाकूर याची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.













