शाळेतून बदली केलेले शिक्षकच आम्हाला परत द्या!

अन्यथा मुलांचे दाखले शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत पाठवणार

शिक्षक प्रश्नी खालची तोंडवळी शाळेतील पालक संतप्त : पंचायत समितीत धडक देत मांडली आक्रमक भुमिका 

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील एका शिक्षकांची दुसऱ्या शाळेत पदवीधर शिक्षक समायोजन नियुक्ती झाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नी पालक व ग्रामस्थानी मालवण पंचायत समिती येथे धडक दिली. बदली केलेला शिक्षकच पून्हा आमच्या शाळेत आणावेत, अशी आग्रही मागणी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. सदर शिक्षकास सोमवार पर्यंत तोंडवळी शाळेत रुजू न केल्यास आम्ही मुलांचे दाखले शाळेतून काढून घेऊ. असा आक्रमक इशारा यावेळी पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.

 

सदर शिक्षकांची झालेली बदली ही शासनाच्या नव्या शैक्षणिक निर्णयातील नियमानुसार आणि समायोजन प्रक्रियेतून झाली आहे, त्या शिक्षकांच्या जागी दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती शाळेत करण्यात आली आहे, असे गटशिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केले. तसेच गटविकास अधिकारी यांनी ही आपण स्वतः गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शाळेला भेट देऊ. शाळेतील अन्य समास्याही जाणून घेऊ त्यावर मार्ग काढू असे सांगितले. मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिले. आमच्या शाळेतून बदली झालेले शिक्षकच आम्हाला परत द्या अशी मागणी पालकांनी कायम ठेवली.

 

तोंडवळी खालची येथील पालक व ग्रामस्थानी पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी परागिनी पाटील, गटशिक्षणाधिकारी संजय माने व पं. स. सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या उपस्थितीत भूमिका मांडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जानव्ही पराडकर, सुरेंद्र मालंडकर, नंदा कोचरेकर, दिपेश मायबा, केतकी मायबा, मनोज चोडणेकर, मनस्वी चोडणेकर, संजय केळूसकर, भूपाल मालंडकर, विजय खवणेकर, संजय तारी,स्वप्नील तारी, संजय जुवाटकर, अनिरुद्ध जुवाटकर, अनुष्का जुवाटकर,प्रमोद तोरसकर, प्रिया तोरसकर, दुर्वा मायबा, पुंडलिक मालंडकर, पूर्वा मालंडकर, प्रगती जुवाटकर, स्नेहल केळूसकर, दिक्षा कोचरेकर, अक्षरा कोचरेकर, नम्रता कोचरेकर, स्नेहा कांदळगावकर, नीलिमा रेवंडकर,

शमिका धुरी, सांची चोडणेकर, घनश्याम चोडणेकर आदी व इतर पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

सातवी पर्यत असलेल्या या शाळेची एकूण पटसंख्या २८ असून पूर्वी येथे तीन शिक्षक कार्यरत होते. मात्र, पदवीधर शिक्षक समायोजन प्रक्रियेत शाळेतील एका शिक्षकांची अन्य ठिकाणी बदली झाली. ल्यामुळे एक मुख्याध्यापक आणि एक सहशिक्षक असे दोनच शिक्षक शाळेत राहिले. यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असून त्यांची व्यवस्थित शिकवणी होत नाही. शाळेत गेल्या ६ ते ७ वर्षांपासून उपशिक्षकाचे पद रिक्त आहे. गेल्या ८ वर्षात या शाळेत १७ शिक्षक बदली होऊन गेले आहेत, इतके वर्षे आम्ही शैक्षणिक बाबतीत तडजोड करत आलो आहोत, पण आता मुलांच्या भविष्याशी तडजोड करणार नाही, असे पालकांनी स्पष्ट केले. शिक्षक उत्तम प्रकारे अध्यापन करत असतान, त्यांची बदली होण्याचे प्रकार सातत्याने झाले. यापूर्वी अनेकवेळा सहकार्य केले मात्र आता करणार नाही. आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाहो. बदली झालेले शिक्षक परत आम्हाला मिळावेत. नवीन शिक्षक आल्यास त्यांच्याशी जुळवून घेण्यास मुलांना मोठा कालावधी जाईल, त्यामुळे पूर्वीच्याच शिक्षकाची येथे पुन्हा नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांनी लावून धरली.

 

पालक आपल्या मागणीवर ठाम राहिले. आम्हाला तेच शिक्षक पुन्हा नियुक्त करा. नवीन शिक्षक आम्हाला नको. प्रशासन अधिकारी यांनी आमच्या शाळेत यावे. त्यावेळी संबंधित त्याच शिक्षकाना नियुक्ती देऊन शाळेत यावे. अन्यथा पालक आपल्या मुलांचे दाखले प्रशालेतून काढून घेतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.