एम.बी.ए. प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्र पडताळणी व सुविधा केंद्र सह्याद्री MBA सावर्डे येथे सुरू

चिपळूण (प्रतिनिधी) : राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्ष महाराष्ट्र राज्य, यांनी विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एम.बी.ए. व एम.एम.एस. प्रवेश प्रक्रिया ३ जुलैपासून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना एम.बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे व नोंदणीनंतर मूळ कागदपत्रे पडताळणी प्रत्यक्षात सुविधा केंद्रावर जाऊन करून घेणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुविधा केंद्राची नियुक्ती केली आहे.
दरवर्षी प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एम.बी.ए. प्रवेश प्रक्रिया २०२६ करिता सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सावर्डे महाविद्यालयाला सुविधा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. गेले १० वर्ष हे सुविधा केंद्र यशस्वी पणे सुरू आहे. केंद्राचे उद्घाटन नुकतेच बी.एस्सी. आयटीचे प्राचार्य एकनाथ गावडे, प्राचार्य रतन कांबळे, प्राचार्य तानाजी कांबळे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दि. ३ ते १२ जुलै पहिल्या टप्प्यात कागदपत्रे पडताळणी होतील. तर दुसऱ्या टप्प्यात ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे सुविधा केंद्र सुरू असेल. याचे संपूर्ण वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org यावर उपलब्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एम.बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक यांनी केले आहे.