रत्नागिरी : पावसाळ्यातील मुसळधार पाऊस, वादळी वारे, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे वीजयंत्रणेचे नुकसान होऊन विद्युत अपघात होण्याची शक्यता वाढते असल्याने नागरिकांनी सार्वजनिक तसेच घरगुती वीजयंत्रणेबाबत अधिक सतर्कता बाळगावी, संभाव्य धोका टाळण्यासाठी काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. अशा परिस्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अतिवृष्टीमुळे झाडे अथवा फांद्या पडून वीजतारा तुटणे, वीजखांब वाकणे किंवा कोसळणे, रोहित्रे व फिडर पिलर परिसरात पाणी साचणे, तसेच ओलसर विद्युत उपकरणांमुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. तुटलेल्या किंवा लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. अशा तारांना स्पर्श करण्याचा किंवा त्या हटविण्याचा प्रयत्न करू नये. घरातील विद्युत सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष द्यावे. पाणी हे विजेचे उत्तम वाहक असल्याने ओलसर स्विचबोर्ड किंवा विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. घरातील अर्थिंगची नियमित तपासणी करून घ्यावी. विजेवर चालणारी उपकरणे वापरल्यानंतर स्विचबोर्डवरून बंद करावीत, ग्रामीण भागात वीज खांबांना अथवा स्टे वायरला जनावरे बांधू नयेत आणि वीजतारांच्या जवळ कपडे वाळत घालू नयेत. इन्सुलेशन निघालेल्या उघड्या वायरची खबरदारी घ्यावी. अशा वायरी तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात. सार्वजनिक ठिकाणी असलेले रोहित्र, वाहिनी पिलर, रोहित्र पेट्या किंवा इतर वीजयंत्रणेजवळ जाणे टाळावे. वीजपुरवठा खंडित झाल्यास घाईगडबड न करता काही वेळ प्रतीक्षा करून महावितरणच्या ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा.
वीजखांब पडणे, वीजतारा तुटणे, रोहित्र जळणे किंवा इतर कोणतीही विद्युत बिघाडाची माहिती देण्यासाठी महावितरणचे 1912, 19120, 1800-233-3435 आणि 1800-212-3435 हे टोल-फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल देण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
आपल्या शेजाऱ्यांनी, नातेवाईकांनी किंवा मित्रांनी असुरक्षित वीज वापर करत असल्याचे दिसल्यास त्यांना सावध करा. आपण आपल्या ज्ञानाद्वारे एक जीव वाचवू शकतो – हेच आपले खरे योगदान!












