.. तर महावितरणच्या कार्यालयालाच टाळे ठोकू-उपसभापती अभिजित गुरव यांचा इशारा

महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील जनतेला फटका
देखभाल दुरूस्तीची कामे वेळत न केल्यानेच आज अनेक ठिकाणी २० ते २४ तास विजपुरवठा खंडीत
कोदवली, नेरकेवाडी परिसर साडेअठरा तास अंधारात

राजापूर । प्रतिनिधी : राजापुरात महावितरणच्या अनागोंदी कारभाचा फटका या पावसातही जनतेला बसत आहे. पावसाळयापुर्वी देखभाल दुरूस्तीची कामे योग्य पध्दतीने न केल्याने आज पावसाळयात जनतेला २० ते २४ तास अंधारात रहावे लागत आहे. महावितरणच्या या अनागोंदी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व तालुका पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून जर अशीच परिस्थिती सुरू राहिली, महावितरणच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर मग महावितरणच्या कार्यालयालाच टाळे ठोकू असा ईशारा गुरव यांनी दिला आहे.
पावसाळा सुरू होताच महावितरणच्या कारभाराची लक्तरे वेशीवर आली आहेत. एक तासही विजपुरवठा सुरळीत सुरू रहात नाही अशी शहरासह ग्रामीण भागात अवस्था आहे. मग उन्हाळी हंगामात दर सोमवार देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली दिवसभर विजपुरवठा बंद ठेऊन महावितरणने काय केले असा खडा सवाल गुरव यांनी उपस्थित केला आहे. शासनाकडून लाखो रूपये महावितरणला विविध कामांसाठी देण्यात आलेले आहेत, मग कामे का होत नाहीत, जीर्ण विजवाहिन्या, पोल बदलणे काम वेळेत काम केली जात नाहीत, शहरासह ग्रामीण भागात विजवाहिन्यांवर आलेली झाडे त्या त्या वेळी का कट केली जात नाहीत असा सवाल गुरव यांनी उपस्थित केला आहे.
विजबिले वेळेत भरली नाहीत तर वसुली पथके पाठवून विजपुरवठा खंडीत करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांची विजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी नाही काय असाही सवाल गुरव यांनी उपस्थित केला आहे.
शहरासह ग्रामीण भागात गेले पंधरा दिवस हीच परिस्थिती आहे., अनेक भागात दहा ते वीस तास विज पुरवठा खंडीत रहात आहे. तर काही भागात तर वारंवार लाईट ट्रीप हेण्याच्या घटना घडत आहेत. यात ग्राहकांनाही फटका बसत असून विद्युत यंत्रे निकामी होत आहेत. याला जबाबदार कोण असा सवाल गुरव यांनी उपस्थित केला आहे.
कोदवली नेरकेवाडी परिसर साडेअठरा तास अंधारात
शनिवारी सायंकाळी ५ वाजता कोदवली, नेरकेवाडी भागातली विजपुरवठा खंडीत झाला होता. यावेळी आपण तात्काळ उपअभियंता जमिर तांबोळी यांना तीन वेळा दुरध्वनीवर सपंर्क साधून माहिती दिली व लवकरात लवकर विजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. मात्र याची वेळेत दखलच महावितरणने घेतली नसल्याचा आरोप गुरव यांनी केला. सायंकाळी उशीरा कर्मचारी बिघाड शोधत होते, तोपर्यंत अंधार झाला होता. रात्री १० वाजता आता लाईट येणार नाही, कोदवली येथे वाहिनीवर झाड पडले आहे असे सांगण्यात आले. रविवारी सकाळी ११.३० वाजता म्हणजे तब्बल साडेअठरा तासाने या भागातील विजपुरवठा सुरू झाला आहे. ही नेमकी कामाची कुठली पध्दत आहे असा सवालही गुरव यांनी उपस्थित केला आहे. शुक्रवारी दिवसभर या भागात विजपुरवठा बंद होता. आणि शनिवारी साडेअठारा तास लाईट नाही अशी परिस्थिती असेल तर मग ग्राहकांनी काय करायचे असा सवालही गुरव यांनी उपस्थित केला आहे. महावितरणचे कर्मचारी निश्चितच भर पावसातही विजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. पण नेमकी ही परिस्थितीच येता कामा नये, पावसाळयापुर्वी आवश्यक त्या सर्व बाबी पुर्ण करण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले पाहिजे ते होत नसल्यानेच आज तालुक्यात विजेचा हा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे गुरव यांनी नमुद केले.
भविष्यात यात सुधारणा झाली नाही, विजपुरवठा सुरळीत सुरू राहिला नाही तर मग जनतेचा नक्कीच उद्रेक होईल आणि महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन अशा निष्क्रिय पध्दतीने काम करत असलेल्या कार्यालयालाच आपण टाळे ठोकू असा ईशारा गुरव यांनी दिला आहे.