मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
सावंतवाडी:सावंतवाडी-मळगाव रेल्वे फाटक ते निरवडे मार्गावरील गतिरोधकांची उंची नियमापेक्षा जास्त असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे गतिरोधक तातडीने लहान करण्यात यावेत, अशी मागणी मळेवाड-कोंडुरे गावचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (सा.बां.) केली आहे. यासोबतच बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
काही वर्षांपूर्वी या मार्गावरून डंपरद्वारे मोठ्या प्रमाणावर लोहखनिजाची वाहतूक केली जात होती. त्यावेळी अपघातांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे गतिरोधक बसवले होते. तत्पूर्वी हा रस्ता पूर्णपणे डांबरी नव्हता, काही भाग मातीचा होता. त्यामुळे खनिज वाहतूक करणारे डंपर वगळता इतर वाहनांची वर्दळ या मार्गावर खूपच कमी असायची.
परंतु, आता सार्वजनिक बांधकाम विभागाने या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कमालीची वाढली आहे. असे असतानाही, पूर्वीचे सुमारे सहा इंचांपेक्षा जास्त उंचीचे गतिरोधक अजूनही तसेच आहेत. या अतिउंच गतिरोधकांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे तळ भाग (चेसिस) खाली घासतात, ज्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, हे गतिरोधक वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. म्हणूनच यांची उंची तातडीने कमी करण्याची मागणी हेमंत मराठे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना मोबदला देण्याचीही मागणी
या रस्त्याचा काही भाग स्थानिक शेतकऱ्यांच्या खासगी मालकीचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता या खासगी जागेतून रस्ता काढल्याचा आरोप होत आहे. यामुळे या मार्गावर दुरुस्ती किंवा इतर कामे करताना स्थानिक शेतकरी प्रशासनाला अटकाव करतात. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्यासाठी संपादित करण्यात आल्या आहेत, त्यांना शासनाकडून योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी हेमंत मराठे यांनी केली आहे. बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाला रीतसर निवेदन देणार असल्याचेही उपसरपंच मराठे यांनी यावेळी स्पष्ट केले.













