वादळी वाऱ्याने घरावर कोसळले होते फणसाचे झाड : घटनास्थळी भेट देत पाहणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : तालुक्यातील सांगेली येथील रहिवासी विष्णू राऊळ यांच्या निवासी घरावर फणसाचे मोठे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी तात्काळ सांगेली येथे धाव घेत घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. झाड कोसळल्यामुळे राऊळ यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची गांभीर्य ओळखून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी संकटग्रस्त राऊळ कुटुंबाची भेट घेतली व त्यांना धीर दिला. तसेच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी वैयक्तिक पातळीवर राऊळ कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द केली.
या प्रसंगी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, बाबुराव कविटकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, रमाकांत राऊळ तसेच दीपक सांगेलकर आदी प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
घटनास्थळाची सविस्तर पाहणी केल्यानंतर जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त कुटुंबाला प्रशासनाकडून आणि शासनाकडून योग्य ती भरपाई तसेच आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः कटिबद्ध असून, त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. या संकटसमयी शिवसेना राऊळ कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.













