चिपळूणमध्ये पावसाचा जोर ओसरला; वाशिष्ठी नदीची इशारा पातळी झाली कमी!

तोपर्यंत व्यापाऱ्यांसह नागरिकांची उडाली त्रेधातिरपीट!
गुरुवारी सकाळपासूनच नगर परिषदेचे कर्मचारी लागले साफसफाईच्या कामाला
प्रशासनाच्या सतर्कतेचे होतेय सर्वत्र कौतुक!

चिपळूण (प्रतिनिधी):- गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे रविवारी वाशिष्ठीसह शिवनदीने इशारा पातळी ओलांडली होती. तर बुधवारी दसपटी आणि पंधरागाव परिसरातील खोऱ्यात ढगसदृश्य पाऊस कोसळल्याने वाशिष्ठीसह शिवनदीतील पाणी वेगाने वाढल्याने बुधवारी सायंकाळी उशिरा इशारा पातळी ओलांडली आणि बाजारपूल, भेंडी नाका भाजी मंडई परिसर वडनाका चिंचनाका वेस मारुती मंदिर आणि सखल भागात पाणी शिल्ले होते तसेच खेर्डी माळेवाडी येथे देखील पुराचे पाणी शिरल्याने चिपळूण व खेर्डी येथील नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. सुदैवाने बुधवारी रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू नदीच्या पाण्याच्या पातळी कमी झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर गुरुवार सकाळपासूनच चिपळूण नगर परिषद अलर्ट मोडवर आली असून साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रांताधिकारी आकाश लिगाडे, यांच्यासह तहसीलदार प्रवीण लोकरे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, प्रमोद ठसाळे आदी अधिकारी वर्ग लक्षात ठेवून होते. दरम्यान, आमदार शेखर निकम पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत गेले असले तरी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच या संदर्भातील सर्व माहिती प्रशासनाकडून वेळोवेळी घेत आहेत.

बुधवारी दिवसभर चिपळूण शहरात अजून मधून पावसाची संततधार सुरू होते मात्र दसपटी आणि पंधरा गाव परिसरातील खोऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने सायंकाळी पासून वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहू लागली त्यातच कोळकेवाडी धरणातून वीज निर्मिती सुरू झाल्याने ते पाणीही वाशिष्ठी नदीला मिळाले आणि वाशिष्ठीसह शिवनदीच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली. यामुळे चिपळूण बाजार पूल परिसर, भेंडी नाका, पानगल्ली, रंगोबा साबळे रोड भाजी मंडई चिंचनाका वडनाका वेस मारुती मंदिर आधी सखल भागात पुराचे पाणी शिरले. ही परिस्थिती लक्षात घेता व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या संपूर्ण परिस्थितीवर महसूल व चिपळूण नगरपरिषद प्रशासन लक्ष ठेवून होते. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. तर चिपळूण नगरपरिषदेने भोंगा वाजवून सतर्कतेचा इशारा दिला. खेर्डी माळेवाडी येथे देखील पुराचे पाणी घुसले.

पाण्याची तीव्रता बघून नागरिकांनी साहित्याची हलवाहलव सुरुवात केली. कोळकेवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ५६ मिलिमीटर इतका पाऊस पडल्याने धरणाची पाणी पातळी १३२.९० मीटर झाली. त्यामुळे दोन मशीनद्वारे वीज निर्मिती करण्यात आल्याने सायंकाळी ७ वाजता वाशिष्ठी नदीने दुसऱ्यांदा इशारा पातळी गाठली. या नदीची इशारा पातळी ५ मीटरची आहे. ती ५.२ मीटर झाली होती. यामुळे वाशिष्ठीचे पाणी नदीकिनारी परिसरात आले होते. तसेच पंधरागाव व दसपटीच्या खोऱ्यात ढगसदृश्य पाऊस पडल्याने या भागातील नद्या दुथड्या भरून वाहत होत्या. काडवली- निरबाडे नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, बुधवारी उशिरा रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने वाशिष्ठी नदीची पातळी कमी झाली आहे.