भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची बोचरी टीका
मालवण | प्रतिनिधी : भाजपच्या विकासकामांची गती व भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेशाच्या लागलेल्या रांगा पाहून वैभव नाईक यांच्यासमोर पराभवाचे ढग आतापासूनच गडद झाले आहेत. स्वतःच्या अस्तित्वाची भीती निर्माण झाल्यानेच आ. वैभव नाईक वैफल्यग्रस्त झाले आहेत.
अशी बोचरी टीका भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रात चिंदरकर म्हणाले, मुंबई गोवा महामार्ग गतिमान पद्धतीने काम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रविंद्र चव्हाण स्वतः लक्ष घालून आहेत. गणेश चतुर्थी उत्सवापूर्वी एक लेन रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेही विशेष लक्ष आहे. सोबतच माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे व अन्य भाजप पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केंद्रीय मंत्री नारायण राणे, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सतत संपर्कात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गतिमान व दर्जेदार पद्धतीने काम सुरू असल्याचे भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक कामांत भाजप नेतेमंडळी एकोप्याने कार्यरत असल्याने कामही गतिमान होत असल्याचे पाहून ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना स्वतःच्या भविष्याची चिंता लागली आहे. त्यांच्या उरात धडकी भरल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.
सोबतच शिवसेना (शिंदे गट) प्रवेशासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वैभव नाईक यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मोठी अडचण ठरत आहेत. तर दुसरीकडे वैभव नाईक यांच्या सोबत असणारे अनेकजण त्यांची साथ सोडत आहेत. भाजपा कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्ष प्रवेशाची रांग लागली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेले वैभव नाईक आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत भाजपवर टीका टिपण्णी करत आहेत.
मात्र जनता सुज्ञ आहे. विकासाची धमक फक्त भाजपात आहे. हे जनताही ओळखून आहे. त्यामुळे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत जनतेच्या मोठ्या पाठींब्यावर भाजपची विजयी घौडदौड सुरूच राहील. असा विश्वास भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.












