शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या आगामी १८ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा ॲड. नीता कविटकर सावंत, शहराध्यक्ष नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजू परब यांनी पुढे सांगितले की, आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस यंदा कोणताही भपका न करता पूर्णपणे सामाजिक भावनेतून साजरा केला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाता संघटनेच्या वतीने आणि नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या विशेष माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवसेना महिला संघटनेच्या वतीने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.
याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून मतदारसंघातील अंध बांधवांना आवश्यक ती मदत करणे, गरजू व गरिबांना छत्री आणि धान्य वाटप करणे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करणे अशा विविध कल्याणकारी उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या सर्व वाढदिवस सोहळ्याला आणि उपक्रमांना स्वतः आमदार दीपक केसरकर यांनी उपस्थित राहावे, यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येणार असल्याचेही परब यांनी यावेळी स्पष्ट केले.













