दरडग्रस्त बेघर पोसरेवासीयांचा प्रश्न ६ महिन्यात निकाली निघणार !

खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघासह आपद ग्रस्त नागरिकांना प्रशासना चे आश्वासन

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील पोसरे येथील दरड ग्रस्त नागरिकांना आगामी ६ महिन्यात तालुक्यातील असगणी येथे पुनर्वसन होऊन त्यांना हक्काची घरे मिळतील या साठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे लेखी पत्र येथील खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाला देण्यात आल्याने स्वातंत्र दिनी छेडण्यात आलेले लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले.

पोसरे येथे २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळून ९ घरांतील १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेला तब्बल २ वर्षांचा कालावधी लोटून देखील शासन स्तरावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने आपद्ग्रस्त अलोरे चिपळूण या ठिकाणी वंचिताचे जीवन जगत आहे या पार्श्वभूमीवर येथील दरड ग्रस्त नागरिकांना न्याय मिळावा या करिता खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने येथील प्रांताधिकारी, तहसीलदार कार्यालय यांच्या कडे निवेदने सादर करून देखील कोणतीच ठोस उपाययोजना न केली गेल्याने तालुका संघाने दरड ग्रस्त ग्रामस्थां समवेत उपोषणाचा मार्ग अवलंब करत स्वातंत्र्य दिनी येथील तहसीलदार कार्यालयांच्या आवारात उपोषण छेडले होते.

दरम्यान उपोषण स्थळी येथील तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच यांची समजूत काढण्या चा प्रयत्न केला मात्र तहसीलदार सोनावणे यांची भूमिका न पटल्याने त्यांनी आणलेले पत्र त्यांना परत देण्यात आले.

या नंतर प्रांताधिकारी राजश्री मोरे यांनी भेट घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष राजरत्न तांबे , सरचिटणीस संदिप तांबे, सुधीर जाधव, विरसेन मोरे आदी पदाधिकारी यांनी दरड ग्रस्त नागरिकांची व्यथा मांडत मागासवर्गीय असल्या मूळे अन्याय करत असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला न्याय न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल असा गर्भित इशारा देखील या वेळी देण्यात आला या वेळी या बाबत चा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला असून याची आगामी ६ महिन्यात अमलबजावणी करून खेड तालुक्यातील असगणी येथे हक्काची घरे उभी करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याने दुपार नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.