तलाठी परीक्षेसाठी दुसऱ्या टप्यात सुद्धा जिल्हा बाहेरील केंद्र !
टीसीएस चोळतेय बेरोजगारांच्या जखमेवर मीठ
मसुरे | झुंजार पेडणेकर
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने महसूल विभागांतर्गत ४३४४ तलाठी पदांसाठी पहिल्या टप्यातील ऑनलाइन परीक्षांना १७ ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे. संपूर्ण राज्यातून तब्बल १३ लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. TCS च्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार असून १९ दिवसांच्या कालावधीत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. सदर परीक्षेत पहिल्या टप्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना जिल्हाबाहेरील परीक्षा केंद्र आली आहेत. आता दुसऱ्या टप्यातील म्हणजे
२६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर कालावधीत होणाऱ्या परीक्षांसाठी केंद्र जाहीर झाली असून या टप्यात सुद्धा सिंधुदुर्ग मधील उमेदवारांना कोल्हापूर जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी जावे लागणार असल्याने बेरोजगार युवकांना आर्थिक भार सोसण्या बरोबरच वेळेत परीक्षा केंद्र न गाठल्यास परीक्षेस मुकण्याची सुद्धा नामुष्की ओढवणार आहे.
*सिंधुदुर्ग केंद्र पसंती साठी का दिलं?*
वस्तुतः अर्ज भरताना टीसीएस कडून सिंधुदुर्ग हे केंद्र दिलेले असल्याने बेरोजगार युवकांनी पहिली पसंती जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी दिली होती. दुसरा पर्याय प्रवासा साठी सोपा असा मुंबई तर तिसरा कोल्हापूर दिला होता. परंतु आता दुसऱ्या टप्यातील परीक्षेसाठी सुद्धा जिल्हा बाहेर जाऊन परीक्षा द्यावी लागणार असल्याने बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम टीसीएस कडून करण्यात आले आहे.
*जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळणे गरजेचे*
परीक्षेच्या तीन दिवस अगोदर उमेदवारांना परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. परीक्षा १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नियोजित आहे.हॉल तिकीट ची कलर प्रिंट न्यायची आहे.या परीक्षेचा ऑक्टोबरमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे. पहिल्या टप्यातील परीक्षेसाठी जिल्ह्यातील उमेदवारांना कोल्हापूर केंद्र आल्या नंतर विविध माध्यमातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यात परीक्षा केंद्र मिळणार असे सांगण्यात आले होते.परंतु आता दुसऱ्या टप्यातील उमेदवारांना निश्चित केलेली परीक्षा केंद्र कळविण्यात आली असून जिल्ह्यातील उमेदवारांना कोल्हापूर केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने सुद्धा याबाबत तातडीने लक्ष घालून सिंधुदुर्ग साठी परीक्षा केंद्र मंजूर करून घेणे आवश्यक आहे.
*जिल्ह्यातील उमेदवारांच्या गैरसोईची दखल कोण घेणार?*
महाराष्ट्र तलाठी अधिसूचना २०२३ नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. महाराष्ट्र तलाठी लेखी परीक्षा १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट. दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर.
तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत परीक्षा होणार आहेत. परीक्षा फी १ हजार असून सुद्धा बेरोजगार उमेदवारांनी नोकरीच्या अपेक्षेने अर्ज भरले होते. अर्ज भरताना सिंधुदुर्ग मधील उमेदवारांनी परीक्षेसाठी सिंधुदुर्ग केंद्राला पहिली पसंती दिली होती. पण आता दिलेला जिल्हा सोडून दुसऱ्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतर परीक्षा यशस्वीपणे ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्यात होत असताना टीसीएस ने तलाठी परीक्षेसाठी जिल्हा बाहेर केंद्र उमेदवारासाठी निवडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.











