डोंबिवलीतील डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर तिघांना न्यायालयाने १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रमेश म्हात्रे यांना न्यायालयात आणताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी काही वकिलांनी आरोपीला “व्हीआयपी ट्रीटमेंट” दिली जात असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. यावरून न्यायालय परिसरात काही काळ पोलीस आणि वकिलांमध्ये धक्काबुक्की झाली. वकिलांनी याविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
या प्रकरणातील सुनावणी कल्याण सत्र न्यायालयात झाली. न्यायालय क्रमांक ६ मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. कात यांच्या समोर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. आरोपींच्या बाजूने ॲड. आनंद गावी, तर सरकार पक्षाकडून ॲड. आनंद आढसकर यांनी बाजू मांडली.
दरम्यान, विरोधी पक्षाकडून या प्रकरणावर टीका करण्यात आली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित काही वकिलांनी पोलिसांच्या वागणुकीवर आक्षेप घेतला. पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली असून, याप्रकरणी आंदोलन करण्याचा इशाराही वकिलांनी दिला आहे.








