न्हावेली – श्रेयस गावडे
न्हावेली-रेडी महामार्गावरील चौकेकरवाडी येथे अत्यंत धोकादायक बनलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात न्हावेलीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी पुकारलेल्या लढ्याला अखेर मोठे यश आले आहे. या मार्गावर अत्यंत आवश्यक असलेल्या साईड पट्टीच्या आणि संरक्षक भिंतीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, यामुळे वर्षानुवर्षे जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्हावेली-रेडी हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, चौकेकरवाडी येथील भागात रस्त्याला योग्य साईड पट्टी आणि संरक्षक भिंत नसल्यामुळे हा रस्ता अपघाताचे केंद्र बनला होता. प्रशासनाने या ठिकाणी केवळ तात्पुरते पत्र्याचे बॅरेल्स उभे केले होते, ज्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत था. पावसाळ्यात तर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा आणि शेजारील दरीचा अंदाज येत नव्हता. या गंभीर समस्येमुळे येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत होते. या सार्वजनिक समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना वारंवार निवेदने देऊनही त्याची कोणतीही दखल घेतली जात नव्हती.
प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर, सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित आणि निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गावडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयात धडक देऊन कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याशी विविध रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली आणि तातडीने काम सुरू करण्याची मागणी लावून धरली. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची आग्रही मागणीही त्यांनी केली.
लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्याची दखल घेत कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी न्हावेली-रेडी महामार्गावरील जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपअभियंता अजित पाटील व कनिष्ठ अभियंता विजय लोहार यांनी तातडीने उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली. उपअभियंता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बाजूला असणारा मुख्य ब्रीज (पूल) देखील मंजूर झाला असून शासनस्तरावर त्याचा पाठपुरावा वेगाने सुरू आहे.
या यशाबाबत बोलताना अक्षय पार्सेकर यांनी सांगितले की, न्हावेली-रेडी मार्गावरील ही समस्या वाहनचालकांच्या जीवावर बेतणारी होती. आम्ही सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून साईड पट्टीच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे यश माझे एकट्याचे नसून, मला वेळोवेळी खंबीर साथ देणाऱ्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच हे काम करून घेणे शक्य झाले आहे.
या महत्वपूर्ण कामाचा शुभारंभ प्रसंगी अक्षय पार्सेकर, अमोल पार्सेकर, ओम पार्सेकर, सौरभ पार्सेकर, दीपक पार्सेकर, अनिकेत धवण, रोहित निर्गुण, प्रथमेश अरोंडेकर आदी ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.













