मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व आमदार किरण सामंत यांचे नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून आभार
राजापूर प्रतिनिधी: शासनाच्या नगर विकास विभागाकडून शहरांच्या सर्वांगिण विकासासाठी नगर परिषद फंड अंतर्गत राजापूर नगर परिषदेला विविध महत्वपुर्ण विकास कामांसाठी १९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने हा निधी उपलब्ध झाला आहे. राजापूर न. प. ला एवढया मोठया प्रमाणावर भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांसह सर्व नगरसेवकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांसह . जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत.
सोमवारी पत्रकार परिषदेत एड. सौ. खलिफे यांनी याबाबत माहिती दिली व शासनाचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. अशा प्रकारे शहरातील पाच महत्वपुर्ण कामांना निधी मंजूर झाल्याने शहराच्या विकासाला नक्कीच न्याय मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नगरविकास विभागाने १० जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील स्वतंत्र शासन निर्णय जारी केला आहे.
राजापूर नगर पालिकेसाठीचा १९ कोटी रुपयांचा निधी ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना’अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहराच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. राजापूर नगरपरिषद हद्दीमधील नविन प्रशासकीय इमारत बांधणे पाच कोटी, राजापूर नगरपरिषद बहुउद्देशिय सभागृह इमारतीचे बांधकाम करणे तीन कोटी, राजापूर नगरपरिषद हद्दीतील मच्छी, मटण मार्केट इमारत बांधकाम करणे दोन कोटी पन्नास लाख, राजापूर नगरपरिषद हद्दीतील शाळा दुरुस्ती व उद्यान विकसित करणे तीन कोटी व राजापूर नगरपरिषद अंतर्गत जल शुध्दीकरण केंद्र व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे पाच कोटी पन्नास लाख असा एकूण १९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे राजापूर शहरातील नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे एड. सौ. खलिफे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष विनय गुरव, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, काँग्रेसचे गटनेते एड. जमिर खलिफे, शिवसेना गटनेते एड. राहुल तांबे उपस्थित होते.













