धबधब्याकडे जाणारी मात्र वाट बिकट, वयोवृद्ध व महिला पर्यटकांची होतेय गैरसोय
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील निसर्गरम्य सवतकडा धबधबा पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून गेला आहे. कोसळणारा धबधबा, हिरवागार परिसर आणि निसर्गाचे मोहक रूप अनुभवण्यासाठी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि राज्यातील विविध भागांतून दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत आहेत. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तर येथे हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असून परिसर गजबजून जात आहे. रविवारी १२ जुलै रोजी दिवसभर या धबधब्यावर पर्यटकांनी एकच गर्दी केली होती.
मात्र, या धबधब्याकडे जाणारी वाट अत्यंत बिकट असल्याने पर्यटकांचा उत्साह अनेकदा गैरसोयीमध्ये बदलत आहे. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी असलेली पायवाट चिखलमय, निसरडी आणि अनेक ठिकाणी दगडधोंड्यांनी भरलेली आहे. पावसामुळे या मार्गावर घसरून पडण्याचा धोका अधिक वाढला असून विशेषतः वयोवृद्ध, महिला, लहान मुलांसह आलेली कुटुंबे आणि दिव्यांग पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी रेलिंग, मजबूत पायऱ्या किंवा दोरीची व्यवस्था नसल्याने पर्यटकांना एकमेकांचा आधार घेत मार्गक्रमण करावे लागते. अनेक वयोवृद्ध पर्यटक धबधब्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अर्ध्या वाटेतून परत फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वयोवृध्द व महिला पर्यटकांना तारेवरची कसरत करत धबधब्यापर्यंत पोहचावे लागत आहे.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी मूलभूत पर्यटन सुविधांचाही अभाव जाणवत आहे. वाहनतळाचे योग्य नियोजन, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, दिशादर्शक फलक, विश्रांतीसाठी बाके, सुरक्षा रेलिंग, पायऱ्या तसेच आपत्कालीन मदतीसाठी प्रशिक्षित बचाव पथक उपलब्ध करून देण्याची मागणी पर्यटकांकडून सातत्याने होत आहे.
चुनाकोळवण येथील हा सवतकडा धबधबा हा राजापूर तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. मात्र, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास या पर्यटनस्थळाची लोकप्रियता आणखी वाढू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतीने संयुक्तपणे धबधब्याकडे जाणाऱ्या या पायवाटेचे काँक्रीटीकरण, सुरक्षित पायऱ्या व रेलिंगची उभारणी, तसेच आवश्यक पर्यटन सुविधा उभाराव्यात, अशी जोरदार मागणी पर्यटक आणि स्थानिकांकडून होत आहे.
या धबधब्याकडे मंदरूळ कडून आत जाणारा रस्ता चांगला आहे, रस्त्यावरिल झाडीही ग्रामपंचायतीकडून तोडण्यात येत आहे. तर या परिसरात धबधब्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाच्या बाजुला पार्किंगचीही सोय करण्यात आली आहे. भविष्यात ग्रामपंचायतीने अधिक चांगले नियोजन केले व पर्यटकांना सेवा सुविधा पुरविल्या तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते.
आ. किरण सामंत यांनी लक्ष घालण्याची मागणी
राजापूर मतदार संघाच्या विकासासाठी दुरदृष्टी ठेऊन काम करणारे आमदार किरण सामंत यांनी कायमच विकासात्मक कामांना प्राधान्य दिले आहे. राजापूर तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातुन विकास साधताना यातुन रोजगार निर्मिती कशी होईल यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न आहे. आ. सामंत यांनी चुनाकोळवण येथील या सवतकडा धबधब्याकडे जाणाऱ्या वाटेचे नव्या पध्दतीने काम करून पर्यटकांना या ठिकाणी जाणे अधिक सोपे व सुलभ कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत व राजापूरच्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या या समस्यकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.













