कोलगाव येथून घेतले ताब्यात :
फिरोज बाबाच्या घरासह अन्य काही ठिकाणांची झाडाझडती
विनायक राऊतांच्या सुनेचा छळ व जादूटोणा प्रकरण वेगळ्या वळणावर
अन्यही काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता
सावंतवाडी:
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणाचा तपास कमालीचा वेगवान झाला आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी भोंदू फिरोज बाबा शेख याच्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील घराची मंगळवारी कसून झाडाझडती घेतली. याचदरम्यान, या अघोरी कृत्यात फिरोज बाबाला साथ देणाऱ्या त्याचा मुख्य साथीदार राम यल्लाप्पा वडार यालाही पोलिसांनी कोलगाव येथून ताब्यात घेत अटक केली. चौकशीत राम वडार याने गुन्ह्याची कबुली दिल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे.
*कोलगावमध्ये पोलिसांची छापेमारी आणि झाडाझडती*
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, संशयित फिरोज बाबा याने तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केले होते. या तक्रारीवरून ठाणे पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगाव येथून फिरोज बाबाला अटक केली होती. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीदरम्यान फिरोज बाबाने दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांची दोन पथके मंगळवारी पुन्हा एकदा कोलगावमध्ये धडकली. पोलिसांनी फिरोज बाबाच्या घराची सखोल झडती घेतली, तसेच त्याच्याशी संबंधित इतर संशयास्पद जागांचा तपास करत काही ठिकाणांची छायाचित्रे घेतली. या झाडाझडतीदरम्यान पोलिसांच्या हाती काही संशयास्पद वस्तू लागल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मुख्य साथीदार राम वडार गजाआड; गुन्ह्याची दिली कबुली
ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने या तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य भोंदू फिरोज शेखचा मुख्य साथीदार राम यल्लाप्पा वडार याला सिंधुदुर्गातून अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच राम वडार याने या अघोरी गुन्ह्यात आपला प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली दिली. दरम्यान, मुख्य आरोपी फिरोज शेख याची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. नवीन आरोपीच्या अटकेमुळे आणि त्याने दिलेल्या कबुलीमुळे ठाणे पोलीस आता फिरोज शेखच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे करणार आहेत. कोठडी वाढल्यास या प्रकरणात आणखी काही धक्कादायक नावे आणि खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कारवाईमुळे कोलगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, या व्यक्तीला नेमके कशासाठी ताब्यात घेण्यात आले आहे, याबाबत स्थानिक पातळीवर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तपासाची व्याप्ती वाढणार, बड्या नावांची चौकशी?
या प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच तपासाचा एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. या अघोरी आणि जादूटोणा प्रकरणात आणखी काही बड्या लोकांचा सहभाग आहे का, तसेच फिरोज बाबाला पडद्यामागून कोणी मदत केली होती का, याचा शोध आता ठाणे पोलीस घेत आहेत. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणाची व्याप्ती वाढून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












