श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असणिये येथे ‘गोकृपा अमृतम’ निर्मितीचे प्रशिक्षण; नैसर्गिक शेतीसाठी कृषी विभागाचा पुढाकार

सावंतवाडी | प्रतिनिधी : रासायनिक खतांचा वाढता वापर, उत्पादन खर्चात होत असलेली वाढ आणि जमिनीचा खालावत चाललेला पोत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करावा, यासाठी कृषी विभागाकडून विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १५ जुलै २०२६ रोजी श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असणिये येथे ‘गोकृपा अमृतम’ निर्मितीचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गोरखनाथ गोरे तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री. मिलिंद सुरेश निकम , श्री युवराज भुईम्बर मंडळ कृषी अधिकारी बांदा तसेच श्रीमती मनाली परब उप कृषी अधिकारी बांदा यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि विषमुक्त अन्ननिर्मितीची गरज याविषयी मार्गदर्शन केले.

शिबिरात श्रीमती मनाली परब यांनी ‘गोकृपा अमृतम’ या नैसर्गिक जीवामृताची सविस्तर माहिती देत त्याचे शेतीतील महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढविणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे आणि उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार व विषमुक्त उत्पादन मिळविण्यासाठी ‘गोकृपा अमृतम’ अत्यंत उपयुक्त ठरते.

प्रशिक्षणादरम्यान देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ, ताक आणि पाणी यांचा वापर करून ‘गोकृपा अमृतम’ घरच्या घरी कसे तयार करावे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तयार करण्याची पद्धत, योग्य प्रमाण, वापरण्याची वेळ तसेच विविध पिकांमध्ये त्याचा उपयोग कसा करावा, याविषयी उपस्थितांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.

या प्रशिक्षणाला असणिये गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत नैसर्गिक शेतीविषयी माहिती जाणून घेतली. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व समजावे आणि भविष्यात त्यांनीही नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करावा, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी श्री. गोरखनाथ गोरे यांनी कृषी विभागामार्फत अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम पुढील काळातही विविध गावांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सेंद्रिय गटांना माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रमोद भाई कामत यांच्यातर्फे सेंद्रिय गुळ व ताक याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रशाले तर्फे कुमारी वेदांगी विनायक कोळापटे हिने या उपक्रमाचे स्वागत करत कृषी विभागाचे आभार मानले. नैसर्गिक शेतीचा संदेश ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.