पत्नीवर संशय; घरातून डॉक्टरचा मृतदेह आणि मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत आढळला
पोलीस तपास सुरू; हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट
कर्नाटकातील धारवाड येथे एका डॉक्टरच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर किरण होन्नावर यांचा घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला, तर त्यांचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत सापडला. या प्रकरणात डॉक्टरांच्या पत्नीवर संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
धारवाड : कर्नाटकातील धारवाड येथे डॉ. किरण होन्नावर (वय 45) यांच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. किरण यांचा घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला, तर त्यांचा आठ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत सापडला. या प्रकरणात डॉ. किरण यांच्या पत्नी डॉ. प्रियंका कट्टनहल्ली यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
डॉ. किरण हे भूलतज्ज्ञ (Anesthesiologist) होते, तर डॉ. प्रियंका या नेत्ररोगतज्ज्ञ (Ophthalmologist) आहेत. दोघेही आपल्या मुलासह धारवाडमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. घटनेनंतर जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. किरण यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी वारंवार फोन केला. त्यावेळी डॉ. प्रियंका यांनी फोन उचलून डॉ. किरण ड्युटीवर गेले आहेत, अशी माहिती दिली. मात्र त्यांच्या उत्तरांमुळे संशय निर्माण झाल्याने नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता डॉ. किरण यांचा मृतदेह एका खोलीत आढळला, तर त्यांचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता. मुलाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून पुरावे संकलित करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासानुसार घटना घडली तेव्हा फ्लॅटमध्ये पत्नी आणि मुलगा उपस्थित असल्याचे समोर आले आहे. हत्येमागील नेमके कारण, घटना कशी घडली आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर येणार आहे.
Dharwad, Karnataka, DoctorMurder, DrKiranHonnawar, CrimeNews, PoliceInvestigation, BreakingNews, PraharDigital, MaharashtraNews, RatnagiriNews, SindhudurgNews, NewsRatnagiri, NewsSindhudurg, CrimeUpdate











