मुंबई लोकलमध्ये सीटच्या वादातून हाणामारी; धावत्या ट्रेनमध्ये तिघे जखमी, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

घाटकोपर-अंबरनाथ लोकलमध्ये दोन गट आमनेसामने
लोखंडी कड्याने हल्ला केल्याचा आरोप; जखमींवर उपचार सुरू

मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना समोर आली आहे. घाटकोपर-अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर झोपलेल्या प्रवाशाला उठवल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. डोंबिवली स्थानकानंतर धावत्या लोकलमध्ये झालेल्या हाणामारीत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


मुंबई : मुंबई लोकलमध्ये सीटवर झोपलेल्या प्रवाशाला उठवल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. घाटकोपर-अंबरनाथ लोकलमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या या वादानंतर डोंबिवली स्थानकानंतर धावत्या ट्रेनमध्ये जोरदार मारामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेत लोखंडी कड्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप असून, प्रितेश कनोजिया आणि राजू वाघे यांच्यासह काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्रथम रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर प्रकृतीमुळे पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ लोकलच्या लगेज डब्यात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बसण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर मारामारीत झाले. या घटनेत राजू वाघे (19), साहिल खंदारे (19) आणि प्रितेश कनोजिया (31) हे जखमी झाले आहेत.

दरम्यान, कल्याण रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, संबंधित जखमींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण आणि सहभागी व्यक्तींची भूमिका याचा तपास केला जात आहे.

या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल दृश्यांमध्ये काही प्रवासी वाद करताना दिसत असून, एका व्यक्तीकडून धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र या व्हिडिओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधील सुरक्षेचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत असून, रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजनांवर अधिक लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Source : प्रहार डिजिटल