वक्तृत्व स्पर्धेत वेदा घाडेचा प्रथम क्रमांक
पाटपन्हाळे ( वार्ताहर ) गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग व गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा नुकताच न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात नुकताच संपन्न झाला . सदर विज्ञान मेळाव्यानिमित्त माध्यमिक स्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.
वक्तृत्व स्पर्धेत कु. वेदा प्रवीण घाडे – जामसूत हायस्कूल – प्रथम क्रमांक , कु.श्रेयस सतीश विचारे – आबलोली हायस्कूल – द्वितीय क्रमांक , कु. रिया प्रकाश विचारे – पाटपन्हाळे हायस्कूल – तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ क्रमांक कु. चारुता मंदार आठवले – गुहागर हायस्कूल व कु. समिरा अनंत ठोंबरे – पाचेरी हायस्कूल यांनी संपादन करून सुयश संपादन केले.
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यानिमित्त माध्यमिक स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गुहागर तालुक्यातील दहा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . वक्तृत्व स्पर्धेसाठी गुहागर तालुका कृषी अधिकारी श्रीम.भक्ती यादव , पालशेत मंडळ कृषी अधिकारी श्री.रोहनकुमार चोथे , प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीच्या वैद्यकीय अधिकारी सौ.शशिकला वाडकर यांनी परीक्षक म्हणून योगदान दिले. विज्ञान मेळावा व गौरव समारंभासाठी उपस्थित मान्यवरांचे आयोजकांतर्फे स्वागत करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुहागर तालुका विज्ञान मंडळाध्यक्ष श्री.बी.एन. घुटुकडे यांनी केले.सदर शैक्षणिक उपक्रमासाठी गुहागरच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी सौ.लिना भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. वक्तृत्व स्पर्धेतील सुयशस्वीतांच्या गौरव समारंभासाठी मान्यवर म्हणून कार्यक्रमाध्यक्ष व पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.व्ही.डी.पाटील , गुहागर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अशोक गावणकर , पाटपन्हाळे केंद्रप्रमुख श्री.नामदेव लोहकरे , रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ सदस्य श्री. सुदेश कदम , गुहागर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री.बी.एन.घुटुकडे , उपाध्यक्ष श्री.व्ही.व्ही.ढवल , सचिव श्री.एफ.वाय.सौदागर व बहुसंख्य पदाधिकारी , युनिटेक कम्प्युटर सेंटरचे संचालक प्रा.जहूर बोट आदी उपस्थित होते . कार्यक्रमाध्यक्ष व मान्यवरांनी गुहागर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल सहभागी व यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक यांचे अभिनंदन केले. सदरच्या विज्ञान मेळावा व विद्यार्थी गौरव समारंभाचे सूत्रसंचालन पाटपन्हाळे हायस्कूलचे शिक्षक श्री.डी.एस.निंभोरे यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व वक्तृत्व स्पर्धा या शैक्षणिक उपक्रमांसाठी कार्यक्रमाध्यक्ष , मान्यवर , विद्यार्थी , शिक्षक यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आयोजकांतर्फे आभार मानण्यात आले












