नीट परीक्षेत आदर्श काणेकरची उज्ज्वल कामगिरी; 575 गुणांसह ऑल इंडिया रँकमध्ये मानाचे स्थान

स्वप्निल कदम -कुडाळ :
बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल (सीबीएसई) व बॅरिस्टर नाथ पै करिअर अकॅडमीचा विद्यार्थी आदर्श नितीन काणेकर याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आदर्शने 720 पैकी 575 गुण मिळवत 98.95 पर्सेंटाइल प्राप्त केला असून ऑल इंडिया रँकमध्ये 20 हजारांच्या आत स्थान तसेच कॅटेगरी रँक 9831 मिळवली आहे.

आदर्शने विषयनिहायही उत्कृष्ट कामगिरी करत बायोलॉजीमध्ये 96.60 टक्के, केमिस्ट्रीमध्ये 99.70 टक्के आणि फिजिक्समध्ये 97.56 टक्के गुण मिळवले. या यशामागे बायोलॉजीचे शिक्षक विजयसिंह, मधुरा इन्सुलकर, मंदार जोशी, निशांत झा तसेच इतर विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले.

गेल्या तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, नियमित अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर मूळ माणगाव येथील रहिवासी असलेल्या आदर्शने हे यश मिळवले आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांची प्रेरणा व संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधाही या यशात महत्त्वपूर्ण ठरल्या.

शाळेच्या प्राचार्या चैताली बांदेकर तसेच संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर यांनी आदर्श काणेकर, त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि त्याच्या पालकांचे अभिनंदन करत त्याच्या यशाचा गौरव केला. इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शंभर टक्के उपस्थिती राखत अतिरिक्त मार्गदर्शन वर्गांनाही नियमित हजेरी लावणाऱ्या आदर्शची मेहनत, चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

एमबीबीएस करून डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या आदर्शला या यशामुळे त्याच्या ध्येयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकता आले आहे.

आदर्शचे आई-वडील नीता व नितीन काणेकर यांनी आपल्या मुलाच्या यशाचे श्रेय बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, चेअरमन उमेश गाळवणकर, सेंट्रल स्कूलमधील शिक्षक, विशेषतः बायोलॉजीचे शिक्षक विजयसिंह तसेच सर्व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले. संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासाच्या सुविधा आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त करत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.

नीट परीक्षेतील या घवघवीत यशामुळे आदर्श नितीन काणेकर याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या यशाने परिसरातील नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.