कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या लाभासाठी प्रयत्न करावेत – प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी : कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देवून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी गृहभेटी देऊन चर्चा करुन संबंधिताचे शंका निरसन करावे, अशा सूचना प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय कृती दलाची आज बैठक झाली. या बैठकीला जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी. म्हालटकर, बाल कल्याण समिती सदस्य ॲङ अरुण पणदूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी काटकर, डॉ.सई धुरी, माविमचे जिल्हा समन्यवक नितीन काळे, डॉ.सुमित नागणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक विश्वनाथ कांबळी, चाईल्ड लाईनच्या प्रियंका घाडी, प्रथमेश पेडणेकर आदी उपस्थित होते.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी, कोविड-19 मुळे एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. त्याचबरोबर पती गमावलेल्या विधवांनाही शासनाकडून विविध योजनांचे लाभ देण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोविड -19 मुळे एक पालक गमावलेले बालक 316 आहेत दोन्ही गमावलेली बालक 18 आहेत. विधवा महिला 972 आहेत. 183 बालकांना बाल निधी योजनेंतर्गत लाभ देण्यात आला असून 62 बालकांना लाभ देण्याबाबत टीपणी मंजुरीस्तव सादर करण्यात आली आहे. उर्वरीत 5 बाबतही कार्यवही सुरु असल्याचे ते म्हणाले.डॉ. फड पुढे म्हणाले, अनाथ बालके व विधवा महिलांसाठी शासनाच्या लाभाची प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे अवलोकन करुन संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. तालुकास्तरावर बाल संरक्षण समित्यांच्या बैठकी घ्याव्यात ,गृहभेटी वर भर द्यावा.