अळंबीचा पाऊस सुरु, धरतीच्या उदरातून रानभाज्या उगवण्यास सुरुवात
गुहागर/प्रतिनिधी : आषाढाचा धो धो अविरत कोसळणाऱ्या पावसाने धरती ओलेचिंब झाली असून माळरानावर उगवणाऱ्या अळंबीच्या शोधात रानभटक्यांची पावले वळलेली दिसून येत आहेत. भल्या पहाटे उठून रानात शुभ्र पांढऱ्या उगवणारी अळंबी मिळविण्यासाठी सध्या खवय्यांची भटंकती सुरु झाली आहे. दरम्यान शृंगारतळी पालपेणे येथील पुलावर विक्रेत्यांकडून अळंबीसाठी खवय्यांना प्रति किलो १५० रुपये मोजावे लागत आहेत.
अळंबीचा पाऊस हा वेगळाच असतो. जुन्या जाणत्या लोकांना तो लगेच समजतो. विशेष करुन रानात नियमित गुरे चरावयास नेणारे गुराखी यांचे लक्ष अळंबीकडे अधिक असते. अळंबीचा पाऊस हा अंगाला टोचणारा आणि एखादी अचानक मोठी सर ताडताड करत येते. अनुभवी लोकांना हा पाऊस लगेच समजतो. अळंबी ही प्रामुख्याने लाल मातीचा भाग, जिथे निर्जन ठिकाण असते तेथे उगवते. साधारणतः आषाढाच्या पहिल्या पंधरवड्यात अळंबी उगविण्याचा काळ असतो. अळंबी ही पहाटे उगवते. सफेद शुभ्र कळीदार अळंबी सकाळी फुलली की ती छत्रीसारखी दिसते. रानोमाळ हिरव्यागार गवतात तिचे पांढरेपण लगेच उठून दिसते त्यामुळे तीला शोधणे तसे कठीण नसते.













