सावंतवाडीत २३ जुलै रोजी ‘अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र’ शिबिराचे आयोजन

व्यापारी व उद्योजकांनी उपस्थित रहाण्याचे व्यापारी संघाचे आवाहन

सावंतवाडी:
सावंतवाडी तालुका व्यापारी उद्योजक व व्यावसायिक संघातर्फे गुरुवारी, २३ जुलै रोजी ‘अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र’ कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पई सभागृहात पार पडणार आहे.

​या कार्यक्रमात पुण्याचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ तज्ज्ञ, अन्न पदार्थ सल्लागार आणि प्रशिक्षक श्री. अंकुश जोगदंड हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरादरम्यान सुरक्षित अन्न, अन्नसुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया, मार्गदर्शक तत्त्वे आणि आरोग्य संरक्षण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन केले जाईल.

​या प्रशिक्षण शिबिरात किराणा, हॉटेल, खानावळ, बेकरी, मिठाई, कोल्ड्रिंक्स, स्टॉलधारक, मासे, चिकन, अंडी व मटण विक्रेते, दूध विक्रेते, चायनीज विक्रेते, फरसाण भट्टी चालक, वडापाव, समोसा, भजी व चहा विक्रेते, कॅटरिंग व्यावसायिक, पिठाच्या गिरणीचे व्यावसायिक तसेच बाटलीबंद पाणी विक्री करणाऱ्या सर्व लहान-मोठ्या खाद्य व्यावसायिक व विक्रेत्यांनी सहभागी होणे आवश्यक आहे.

​अन्नसुरक्षा आणि ग्राहकांचे आरोग्य या विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित सर्व व्यापारी व उद्योजकांनी या शिबिराला उपस्थित राहावे. शिबिराच्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी व्यावसायिकांनी सोबत आधार कार्ड आणि त्याची छायांकित (झेरॉक्स) प्रत आणणे अनिवार्य आहे, असे नम्र आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.