# मोबाईलवर पहिल्या पतीशी बोलत असल्याच्या संशयातून संताप, पत्नीचा गळा आवळल्याचा आरोप
वाद विकोपाला गेल्यानंतर घडली घटना, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो, मात्र संशयामुळे अनेकदा नात्यांमध्ये मोठी दरी निर्माण होते. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात संशयाच्या कारणातून एका महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी पहिल्या पतीशी मोबाईलवर संपर्क साधत असल्याचा संशय आल्याने पतीने रागाच्या भरात तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून, ओशिवरा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मुंबई : जोगेश्वरी परिसरात संशयाच्या कारणातून पत्नीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी दुसऱ्या व्यक्तीशी संपर्कात असल्याचा संशय मनात ठेवून पतीने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव शबरुन नेसा रोजामियाँ अन्सारी असे असून, ती जोगेश्वरी पश्चिम, एस. व्ही. रोड परिसरातील गुलशननगर मार्केटजवळील रोस्वाल्ट इमारतीत राहत होती. या प्रकरणी तिचा पती सेराज अन्सारी (20) याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शबरुन नेसा हिचा सेराज अन्सारीसोबत काही काळापूर्वी विवाह झाला होता. यापूर्वी तिचा विवाह आरिफ अन्सारी याच्यासोबत झाला होता. मात्र, शबरुन अजूनही पहिल्या पतीशी मोबाईलवर बोलते, असा संशय सेराजला होता.
या संशयामुळे पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. दोघांमधील वाद वाढत गेला आणि अखेर त्याचे रूप हिंसक घटनेत झाले.
भांडण विकोपाला गेले आणि…
घटनेच्या दिवशीही शबरुन आणि सेराज यांच्यात वाद झाला. बघता बघता हा वाद इतका वाढला की संतापलेल्या सेराजने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळल्याचा आरोप आहे. या घटनेत शबरुनचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात सेराजवर संशय बळावला आणि चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार हत्येचा गुन्हा दाखल करून सेराज अन्सारीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या हत्येमागील नेमके कारण, दाम्पत्यामधील वाद आणि इतर बाबींचा ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.











