स्मार्ट कार्डसाठी सावंतवाडीत ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट

एक ऑगस्टपासून कार्ड सक्तीचे ; केंद्र मात्र बंद!

सावंतवाडी :एसटी महामंडळाच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ ऑगस्टपासून स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी आधार कार्ड हाच वय व अधिवासाचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य मानला जात होता. मात्र, आता नवीन नियमानुसार स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आल्याने आणि सावंतवाडीत सध्या ही सुविधा बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना या भर पावसात नाहक मनस्ताप व ससेहोलपट सहन करावी लागत आहे.

स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम एका खाजगी कंत्राटदाराकडे सोपवण्यात आले आहे. सावंतवाडी येथील कंत्राटदाराने ठरवून दिलेल्या फीपेक्षा २० रुपये जास्त आकारल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या तक्रारींनंतर संबंधित कंत्राटदाराने आपले कार्यालयच बंद केले. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आधीच कागदपत्रे आणि पैसे जमा केले आहेत, त्यांना कार्ड मिळवण्यासाठी बंद कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. दुसरीकडे, एसटी डेपो प्रशासनाकडे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

डेपो व्यवस्थापकांचे कानावर हात

बुधवारी सकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यासाठी आणि मिळवण्यासाठी कार्यालयासमोर रांगेत उभे होते. तब्बल दोन ते अडीच तास ताटकळत राहूनही कार्यालय न उघडल्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांनी एसटी डेपो व्यवस्थापकांची भेट घेऊन या प्रकाराबाबत जाब विचारला. मात्र, डेपो व्यवस्थापकांनी यावर पूर्णपणे कानावर हात ठेवत, “वॉचमनकडून संबंधित मुलीचा फोन नंबर घ्या आणि तिच्याशी संपर्क साधा,” असा अजब आणि बेजबाबदार सल्ला देऊन आपली जबाबदारी झटकली.

*शासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी*

पावसाच्या दिवसांत वयोवृद्ध नागरिकांना अशा प्रकारे ताटकळत राहावे लागत असल्याने “आता न्याय मागायला कुणाकडे जायचे?” असा उद्विग्न सवाल ज्येष्ठ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण अनागोंदी कारभाराची शासनाने आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन सावंतवाडीत स्मार्ट कार्ड सुविधा सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.