कल्याणमध्ये थरारक हत्याकांड; गोणीत भरलेला मृतदेह बाथरूममध्ये लपवला, प्रेयसीवर संशय

# दुर्गंधीमुळे उघडकीस आला खून; बाथरूमचा नळ सुरू ठेवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

व्हॉइस मेसेजमुळे प्रकरणाला कलाटणी; संशयित महिला कोलकात्याकडे फरार

कल्याणमधील एका फ्लॅटमध्ये गोणीत भरलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. बाथरूमचा नळ सुरू ठेवून रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात एका महिलेवर संशय असून ती कोलकात्याकडे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.


कल्याण : मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये गोणीत भरलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येत असल्याने रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता बाथरूममध्ये गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला.

मृताची ओळख पटली

पोलिसांनी मृताची ओळख 37 वर्षीय इस्लाम हमीदुल्लाह अशी पटवली आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाली होती. घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रँच आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून विविध नमुने गोळा करून तपास सुरू केला आहे.

धारदार शस्त्राने हत्या; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

प्राथमिक तपासानुसार, धारदार शस्त्राने इस्लाम हमीदुल्लाह यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये ठेवण्यात आला. तसेच बाथरूमचा नळ सुरू ठेवून रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

व्हॉइस मेसेजमुळे तपासाला वेग

या प्रकरणाला नवे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा फ्लॅटशी संबंधित एका व्यक्तीला व्हॉइस मेसेज प्राप्त झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, हा मेसेज हसीबा नावाच्या महिलेने पाठविल्याचा संशय आहे. या संदेशात संबंधित व्यक्तीची हत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच मृतदेह फ्लॅटमध्ये असल्याची आणि बाथरूमचा नळ सुरू असल्याची माहितीही देण्यात आली होती. या संदेशानंतर संबंधित व्यक्तीने तातडीने पोलिसांना माहिती दिली.

संशयित महिला फरार; पोलिसांचा तपास सुरू

डोंबिवली विभागाचे एसीपी सुहास भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीबा आणि इस्लाम हमीदुल्लाह हे गेल्या काही दिवसांपासून संबंधित फ्लॅटमध्ये राहत होते. प्राथमिक माहितीनुसार, घटनेनंतर संशयित महिला कोलकात्याकडे फरार झाली आहे. या गुन्ह्यात तिच्या पतीचा किंवा इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक कोलकात्याकडे रवाना झाले आहे.