अल्पवयीन मुलगी घरी असूनही पोलिसांना माहिती न दिल्याचा ठपका
कणकवली : अल्पवयीन मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी अभिषेक व्यंकटेश वडार याच्यानंतर आता त्याच्या कुटुंबीयांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरी असल्याची माहिती असूनही पोलिसांना याबाबत कळविले नाही, असा ठपका ठेवत कणकवली पोलिसांनी पोक्सो कायद्यातील कलम २१ अंतर्गत आरोपीची आई, वडील आणि भावाला नोटीस बजावली आहे.
तपासी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आरोपी अभिषेक वडारच्या परबवाडी येथील घरी आढळून आली होती. तपासादरम्यान आरोपीची आई लक्ष्मी व्यंकटेश वडार (४३), वडील व्यंकटेश वडार (६०) आणि भाऊ अनिल वडार (२२) यांना मुलगी घरात असल्याची माहिती असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही.
या पार्श्वभूमीवर पोक्सो कायद्यातील कलम २१ नुसार त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, संबंधित तिघांना पोक्सो कायद्यातील कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वी या प्रकरणात मुख्य आरोपी अभिषेक व्यंकटेश वडार याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करत आहेत.












