मंडणगड | प्रतिनिधी : युवा पिढीमध्ये देशभक्तीची भावना जिवंत ठेवण्यासाठी मंडणगड तालुक्यातील पत्रकारांनी गत दोन वर्षांपासून सुरु केलेला उपक्रम कौतूकास पात्र असून याकरिता शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी 12 ऑगस्ट 2023 रोजी भिंगळोली येथे आयोजीत कार्यक्रमात दिले.
पत्रकार संघाचे वतीने यादव चँरीटी ट्रस्टचे श्रीकृष्ण सभागृहात आयोजीत कऱण्यात आलेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व मान्यवरांचे गौरव सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्री.तटकरे यांची उपस्थिती लाभली. स्वागत समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, संदीप राजपूरे, भाई पोस्टुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार, नगराध्यक्षा अँड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक सुभाष सापटे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. तटकरे पुढे म्हणाले की, संविधानाने या देशाचे प्रत्येक नागरीकास अधिकारांबरोबर जबाबदाऱ्याही दिल्या आहेत, सर्वांना समान न्यायाच्या तत्वाने या देशाचा कारभार चालतो.
नैमीत्तीक जीवन जगत असताना विकासाइतकीच देशाचे हित व महत्वाचे आहे. युवा पिढीने देशाचा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशाने लोकशाही पध्दतीचा अंगीकार करुन विकासाकडे केलेली वाटचाल समजुन घेणेही तितकेच गरजेचे आहे. मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच आग्रही असतो, मंडणगड तालुक्याचा अडलेला विकासाचा मार्ग सुकर व्हावा याकरिता आपण नेहमीच पाठपुरावा करत असून तालुक्याच्या प्रश्नांवर नेहमीच विधायक भुमीका घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रयत्न केले आहेत व भविष्यातही आपला असाच प्रयत्न राहणार आहे. कार्यक्रमाचे निमीत्त साधुन पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार यांच्या हस्ते खासदार सुनील तटकरे यांचा शाल, पुष्पगुच्छ व शिवप्रतिमा भेट देवून गौरव करण्यात आला. तालुक्यातील विविध समाजघटकांचे प्रगतीकरिता काम करणाऱ्या पंरतू प्रसिध्दी झोतात नसलेल्या गुणवंताचा पुरस्कार देवून गौरव कऱण्याचा उपक्रम यंदाचे वर्षापासून पत्रकार संघाने सुरु केला. या कार्यक्रमाचे निमीत्त साधून क्रीडाशिक्षक प्रविण भुवड यांचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार, उपाध्यक्ष विजय पवार, विजय जोशी, कार्याध्यक्ष प्रशांत सुर्वे, कायदेशीर सल्लागार व सचिव दयानंद कांबळे, सचिन माळी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव दयानंद कांबळे व सचिन माळी यांनी केले.










