#
इजिप्तच्या रुकाय्या सालेमवर सरळ सेटमध्ये मात करत अनाहतची सुवर्ण कामगिरी
भारतीय स्क्वॉशसाठी ऐतिहासिक क्षण; एसआरएफआयकडून अनाहतचे कौतुक
भारतातील अव्वल युवा स्क्वॉशपटू अनाहत सिंग हिने जागतिक ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. अंतिम सामन्यात तिने इजिप्तच्या रुकाय्या सालेमचा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयामुळे भारतीय स्क्वॉशला नवे यश मिळाले असून देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कामगिरीला भारतीय स्क्वॉशच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.
नवी दिल्ली : भारताची अव्वल युवा स्क्वॉशपटू अनाहत सिंग हिने जागतिक ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकत देशाच्या क्रीडा इतिहासात नवे पर्व लिहिले आहे. ऑन्टारियो येथे झालेल्या अंतिम सामन्यात १८ वर्षीय अनाहतने इजिप्तच्या रुकाय्या सालेमचा 11-3, 11-7, 11-9 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले.
विजयानंतर भावना व्यक्त करताना अनाहत सिंग म्हणाली की, हा क्षण तिच्यासाठी अविस्मरणीय आहे. गेल्या काही वर्षांत तिला या स्पर्धेत उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ही स्पर्धा आपल्यासाठी जणू शाप ठरली होती, असे वाटत होते. मात्र अखेर शेवटच्या ज्युनियर हंगामात विजेतेपद पटकावता आल्याने हा आनंद अधिकच मोठा असल्याचे तिने सांगितले.
अनाहतने सांगितले की, अंतिम सामन्यापूर्वी स्वतःला शांत ठेवण्यावर आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यावर तिने भर दिला. तणावाखाली आपला खेळ चांगला होत नसल्याचे माहीत असल्याने कोर्टवर उतरल्यावर फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचाच फायदा झाल्याचे तिने नमूद केले.
स्क्वॉश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया (SRFI) चे सरचिटणीस सायरस पोंचा यांनी अनाहतच्या विजयाचे कौतुक करत हा भारतीय स्क्वॉशसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले. अनाहतमध्ये भविष्यात आणखी मोठी यश संपादन करण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी दिवंगत एन. रामचंद्रन यांच्या योगदानाचाही उल्लेख केला. भारतीय खेळाडूने एकेरीत जागतिक विजेतेपद जिंकावे, हे त्यांचे स्वप्न होते. अनाहतच्या या ऐतिहासिक यशामुळे ते स्वप्न अखेर पूर्ण झाल्याचे सांगत त्यांनी तिच्या मेहनतीसह प्रशिक्षक, कुटुंब आणि संपूर्ण भारतीय स्क्वॉश व्यवस्थेचेही कौतुक केले.










