‘आम्ही गुहागरकर’ बॅनरखाली जंतर-मंतर येथील विद्यार्थ्यांवरील अन्यायासाठी एकजूट
गुहागर प्रतिनिधी
जंतर-मंतर येथे आंदोलनाच्या काळात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुहागरमध्ये ‘आम्ही गुहागरकर’ या बॅनरखाली उद्या सोमवार, दि. 27 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुहागर येथे भव्य श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी झालेल्या संघर्षाला पाठिंबा देत आणि या आंदोलनात प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने मान्य केल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या संघर्षाला मानवंदना देणारा आणि समाजाच्या एकजुटीचे प्रतीक ठरणार आहे.
या श्रद्धांजली सभेत गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, पालक, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांप्रती समाजाची सामूहिक बांधिलकी आणि एकात्मता यावेळी अधोरेखित केली जाणार आहे. अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले यावेळी मनसे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, ॲड .संकेत साळवी, सुरेश सावंत, असीम साल्हे, अमिष कदम आदींसह अनेक जण उपस्थित होते. हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजलीपर नसून, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी समाज एकसंघ असल्याचा ठाम संदेश देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.तसेच सरकारने मान्य केलेल्या मागण्या याबाबत देखील आदर व्यक्त केला जाणार असून सरकारचे आभार देखील मानले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.













