नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा
सावंतवाडी:
सावंतवाडी शहर स्वच्छ, निरोगी, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ ची शहरभर काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून, शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, गृहनिर्माण संस्था व व्यावसायिक आस्थापनांना कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या सूचनेनुसार, प्रत्येक घर आणि व्यावसायिक ठिकाणाहून मिळणारा कचरा चार वेगवेगळ्या भागांत वर्गीकृत करावा लागेल. भाजीपाला, फळांची साले, उरलेले अन्न व जैविक कचरा ओल्या कचऱ्यात; कागद, प्लास्टिक, काच व पुठ्ठा सुक्या कचऱ्यात; सॅनिटरी पॅड, डायपर्स व मास्क स्वतंत्र पिशवीत बांधून सॅनिटरी कचऱ्यात; तसेच बॅटरी, बल्ब, औषधे, रंगाचे डबे व कीटकनाशके घातक कचऱ्यात देऊनच वाहनाकडे सुपूर्द करावे लागतील.
नगरपरिषदेने विशिष्ट निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांना ‘बल्क वेस्ट जनरेटर’ घोषित केले आहे. यामध्ये २०,००० चौरस मीटरपेक्षा जास्त बिल्ट-अप क्षेत्रफळ असलेल्या इमारती, दररोज ४०,००० लीटरपेक्षा जास्त पाण्याचा वापर करणाऱ्या संस्था किंवा दररोज १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांचा समावेश आहे. अशा हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संकुलांनी त्यांच्या परिसरातील ओल्या कचऱ्यावर कंपोस्टिंग किंवा बायोगॅसद्वारे स्वतःच प्रक्रिया करणे अनिवार्य राहील. सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठी अधिकृत संस्थेकडे किंवा नगरपरिषदेकडे द्यावा लागेल.
यासोबतच सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्ते, नाले, जलस्रोतांमध्ये कचरा टाकणे, ओला-सुका कचरा एकत्र करणे, कचरा जाळणे, बांधकामाचा ढिगारा टाकणे आणि कचरा संकलन वाहनास सहकार्य न करणे यावर सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘पोल्युटर पेझ प्रिन्सिपल’ नुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. सावंतवाडी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी घरगुती स्तरावर कचरा वर्गीकरण करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.













