गोवा बांबुळी रुग्णालयात मंगळवारी रात्री उपचारादरम्यान निधन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथे दोन आठवड्यापूर्वी आठवडा बाजारादरम्यान चक्कर आल्याने थेट मोती तलावाच्या सांडव्यात कोसळून गंभीर जखमी झालेले फळ विक्रेता अब्दुल रझाक (५५ रा. बाहेरचावाडा, ता. सावंतवाडी ) यांचे गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले १५ दिवस त्यांची सुरु असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. याबाबत अधिक माहिती अशी की, पंधरा दिवसांपूर्वी सावंतवाडी आठवडा बाजारात चिटणीस नाका परिसरात मोती तलावाच्या सांडव्याजवळ संबंधित विक्रेत्याने फळ विक्रीचा स्टॉल लावला होता. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते थेट सहा ते सात फूट खोल सांडव्यात कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढत उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णायात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर
सोहाब बेग व सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गोवा-बांबूळी येथे हलविले.
त्यानंतर गेले पंधरा दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, मंगळवारी रात्री उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेऊन या ठिकाणी रॅलींग बसवावे असे आवाहन सामाजिक बांधिलकी संघटनेमार्फत करण्यात आले आहे.